Ticker

6/recent/ticker-posts

सुसंस्कारित शिक्षण आणि क्रीडात्मक विकास यासाठी नितीन खोत यांचे कार्य प्रेरणादायी... ना. महेश शिंदे



 *जिल्हा घडवण्यात क्रांतीकारक, समाजसुधारकांबरोबरच शिक्षकांचेही योगदान मोलाचे* .


 बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ] 

सर्वांगीण शिक्षण देत असताना गुणवत्तेसोबतच सुसंस्कारित शिक्षण व विद्यार्थ्यांचा क्रीडात्मक विकास साधण्याचे प्रेरणादायी कार्य खटाव पंचायत समितीचे ललगुण व खटाव केंद्राचे केंद्रप्रमुख  नितीन खोत यांनी  केले असल्याचे मत कोरेगाव- खटाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा कृष्णाखोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष ना. महेश शिंदे यांनी मांडले.

 सातारा जिल्हा हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. शिक्षणाची बीजे सुद्धा याच जिल्ह्यात प्रथम रोवली गेली. समाजाला दिशा देणारे अनेक अभिनव उपक्रम या जिल्ह्याने यशस्वी करून दाखवले आहेत. या सातारा जिल्ह्याचा नावलौकिक वाढवण्यात आणि जिल्हा घडविण्यात क्रांतिकारक, समाज सुधारक, विचारवंत यांच्या बरोबरच शिक्षकांचेही योगदान अत्यंत मोलाचे राहिले आहे. यामुळेच आजही शिक्षकांच्या बद्दल समाजात आदर टिकून आहे असेही ते म्हणाले. माझेही आई-वडील दोघेही शिक्षक होते असे सांगतानाच शिक्षक हे ज्ञानदारांबरोबरच संस्कारदानाचेही प्रभावी साधन असतात अशी भावना त्यांनी व्यक्त केली.  केंद्रप्रमुख श्री. नितीन खोत यांच्या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमासाठी आमदार शिंदे हे सपत्नीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या  प्रमुख पाहुणे असलेल्या डॉ. प्रियाताई शिंदे यांनी ग्रामीण भागात मराठी माध्यमाच्या शाळांनी गेल्या काही वर्षांपासून यशस्वीपणे राबवलेल्या  अभिनव उपक्रमांचे विशेष कौतुक करतानाच  श्री. नितीन खोत यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या खटाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती सोनाली विभुते यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये  श्री. नितीन खोत यांनी शिक्षक, मुख्याध्यापक व केंद्रप्रमुख या तिनही पदांना अत्यंत योग्य न्याय देत आपली सेवा बजावल्याचे सांगितले. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच क्रीडात्मक विकासासाठी श्री. खोत यांची नेहमी धडपड राहिली. क्रीडा प्रबोधिनी मध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या महाराष्ट्रात आज सातारा जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची सर्वात जास्त आहे, या उत्तुंग  यशामध्ये  क्रीडा समन्वयक राहिलेल्या श्री नितीन खोत यांचे योगदान कधीही विसरता येणार नाही असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

 कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते श्री उदय शिंदे, प्राथमिक शिक्षक संघाचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष श्री. बलवंत पाटील, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अभयराजे घाटगे, प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर रणनवरे, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत बागल, राजापूरचे माजी सरपंच राजेंद्र पाटील, मुख्याध्यापक संतोष पाटणे, इंजि. नीलम खोत यांची यावेळी भाषणे झाली. सर्वांनी केंद्रप्रमुख श्री नितीन खोत यांच्या शैक्षणिक आणि प्रशासकीय कार्याचे विशेष कौतुक केले.

 यावेळी राजापूर, खटाव, ललगून या तीनही केंद्र समूहातील  शिक्षकांच्या वतीने श्री. नितीन खोत यांना मानपत्र व पोशाख देऊन सपत्नीक  सन्मानित करण्यात आले.

 सत्कारास उत्तर देताना केंद्रप्रमुख श्री. नितीन खोत म्हणाले की, शिक्षक ही केवळ नोकरी नसून ती समाजाची सेवा करण्याची एक मोठी संधी असते. ही संधी समजूनच आयुष्यभर कार्य करीत असताना वेळेचे व शिस्तीचे भान ठेवून सर्वतोपरी काम करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी बदलत्या काळानुसार अध्यापन करण्यावर भर दिला. तसेच प्राथमिक स्तरापासूनच मुलांच्यामध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी आणि मुलांनी पुढे यशस्वी खेळाडू म्हणून उदयास यावे यासाठी क्रीडा समन्वयक म्हणून बरीच वर्ष काम करता आले. याचे समाधान व्यक्त करतानाच आपल्या संपूर्ण सेवा काळासाठी सर्व अधिकारी, शिक्षक सहकारी, ग्रामस्थ, संघटनेतील पदाधिकारी यांच्याबरोबरच आई, पत्नी व संपूर्ण कुटुंबाची लाख मोलाची साथ लाभली असल्याची भावना श्री. खोत यांनी यावेळी व्यक्त केली.

 या सेवापूर्ती गौरव समारंभासाठी खटाव पंचायत समितीच्या  शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती संगीता गायकवाड,  चंद्रकांत सुतार,  बुधचे माजी सरपंच बाळासाहेब इंगळे , भरत मुळे , भाजपाचे तालुकाध्यक्ष शेडगे ,शिक्षक बँकेचे संचालक विशाल कणसे, माजी चेअरमन नवनाथ जाधव, समितीचे जिल्हा सरचिटणीस संतोष मांढरे, महाराष्ट्र राज्य क्रीडा शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष विकास भुजबळ, क्रीडा समन्वयक  जिल्हाध्यक्ष नवनाथ कणसे,  जिल्हा क्रीडा समन्वयक राजाराम तोरणे, क्रीडा समन्वयक नाथा खरमाटे, माण तालुका क्रीडा समन्वयक चंद्रकांत जाधव, खटाव तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष जयकर खाडे, प्रमोद खाडे,  सर्व केंद्रप्रमुख, सर्व विषय तज्ञ, खटाव, ललगुण व राजापूर केंद्रसमूहातील सर्व शिक्षक, विविध संघटनांचे पदाधिकारी, बुध परिसरातील विविध ग्रामस्थ, सेवानिवृत्त अधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अजित चव्हाण यांनी केले. प्रस्ताविक केंद्रप्रमुख संजय दिडके यांनी तर आभार तालुका सरचिटणीस नितीन घनवट यांनी मानले.


 *सेवा बजावलेल्या शाळांना भेटवस्तू प्रदान* 

 सेवापुर्ती कार्यक्रमात वेगळा आदर्श पायंडा पाडत श्री. खोत यांनी ज्या - ज्या शाळेत ज्ञानदानाचे कार्य केले या सर्व शाळांना सेवापुर्ती निमित्त भेटवस्तू प्रदान केली. त्यामध्ये पिंपळाचा मळा (खंडाळा), रणसिंगवाडी, राजापूर, कोकराळे, रेवलकरवाडी, गारवडी, खटाव, ललगुन  या शाळांचा समावेश होता. तर त्यांनी शिक्षण घेतलेल्या जि. प. शाळा बुध व श्री. नागनाथ हायस्कूल बुध यांनाही भेटवस्तू प्रदान केली.