पाटण (दिनकर वाईकर) -
पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजित सिंह पाटणकर यांनी मुंबईत भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांची कराडसह पाटण विधानसभा मतदारसंघात मोठ्या जल्लोषात फटाक्याची आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी स्वागत केले दरम्यान पाटण विधानसभा मतदारसंघात सर्व कामे ठप्प झाली होती सामाजिक व्यवस्था बिघडली होती हुकूमशाही वाढली होती अशा राजकीय संस्कृतीला मोडीत काढण्याची वेळ आली होती त्यामुळे आपण भाजपात प्रवेश केला असून आता येथून पुढे सकारात्मक राजकारणाला चालना देऊयात असे आवाहन सत्यजितसिंह पाटणकर यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले
सत्यजितसिंह पाटणकर यांचे कराड येथे आगमन होताच त्यांनी दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आश्वारूड पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर प्रीतिसंगमावरील स्व. यशवंतराव चव्हाण स्मृतीस्थळास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत सातारा जिल्ह्यातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजपात प्रवेश केल्यानंतर ते पहिल्यांदाच पाटण विधानसभा मतदारसंघात येत असल्याने त्यांचे कराडपासून पाटणपर्यंत ठिकठिकाणी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत मोठ्या उत्साहात स्वागत केले. सत्यजितसिंह पाटणकर तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, जय श्रीराम, छ. शिवाजी महाराज की जय, छ. संभाजी महाराज की जय, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी ठिकठिकाणी महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांचे औक्षण केले. यावेळी कराडपासून ते पाटणपर्यंत भाजप युवकांनी दुचाकी रॅलीचे आयोजन केले होते. ही रॅली पाटणमध्ये आल्यानंतर शिक्कामॅन्शन याठिकाणी सत्यजितसिंह पाटणकर यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांना संबोधित केले.
याप्रसंगी बोलताना सत्यजितसिंह पाटणकर पुढे म्हणाले, भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण सर्वांनी एकजुटीने एकत्रित येवून जे स्वागत केले त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली काम करत असताना प्रत्येक गावात, वाडीत भारतीय जनता पक्षाचा आपण संदेश पोहोचवायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहासाहेब, जे. पी. नडासाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे अध्यक्ष रविंद्र चव्हाण, चंद्रशेखर बावनकुळे साहेब या सर्वांच्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय. काम करताना फडणवीस साहेबांनी जो संदेश दिला आहे त्या संदेशानुसार आपण पाटणमध्ये जनतेत त्यांचा संदेश पोहोच करायचा आहे व भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवायची आहे. एकजुटीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करायची आहे. ज्या काही योजना आहेत त्या सर्वसामान्यपर्यंत पोहाचवायच्या आहेत. आता नवं, जुनं असं काही नाही त्यामुळे सर्वांनी मिळून एकत्रित हातात हात घालून भाजपाचे काम करायचे आहे. येणाऱ्या निवडणुकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा फडकावयाचा आहे. वरिष्ठ पातळीवरून येणाऱ्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून भाजपाची ताकद वाढवायची आहे. आजपर्यंत माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या विचारावर काम करत आलो आहोत, अशाच पध्दतीने यापुढेही आपल्याला संयमाने घेत, सर्व जातीजमातीतील लोकांना एकत्रित करत काम करायचे आहे. यापुढे सकारात्मक राजकारणाला चालना देवूयात, असे आवाहन शेवटी त्यांनी बोलताना कार्यकर्त्यांना केले.
माजी सभापती राजाभाऊ शेलार, युवा उद्योजक याज्ञसेन पाटणकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष नंदकुमार सुर्वे, सुभाषराव पवार, भाजपा पाटण शहराध्यक्ष योगेश महाडीक, संदीप जाधव, उपनगराध्यक्ष सचिन कुंभार, धैर्यशील पाटणकर, दीपकसिंह पाटणकर, संजीव चव्हाण, विलासराव क्षीरसागर, यशवंतराव जगताप, मनोहर यादव, लक्ष्मण चव्हाण, संजय इंगवले, गणेश मोरे, मंगेश पाटणकर पराग चव्हाण, शशिकांत देवकांत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, पाटण नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Social Plugin