Ticker

6/recent/ticker-posts

वालधुनी नदीचे अस्तित्व धोक्यात; निसर्ग प्रेमीमध्ये नाराजी



बदलापूर प्रतिनिधी: 

एकेकाळी गोडय़ा पाण्याची नदी म्हणून ओळख असलेल्या वालधुनी नदीचे रूपांतर आता सांडपाण्याच्या नाल्यात झाले आहे. प्रदूषणाबरोबरच या नदीपात्रामध्ये होत असलेल्या अतिक्रमणामुळे तिचा प्रवाहही कमालीचा संकुचित झाला आहे. अंबरनाथ-उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीत अचानक काही भागात फेस दिसून येत असून रासायनिक सांडपाणी मिसळल्यामुळे हा फेस आल्याचा संशय पर्यावरण प्रेमींनी व्यक्त केला होता

अंबरनाथ आणि औद्योगिक वसाहत परिसरात निर्मिती होणारे रासायनिक सांडपाणी थेट वालधुनी नदीत मिसळू लागले. पुढे उल्हासनगर आणि कल्याण शहरातील असंख्य नाले, घरगुती सांडपाणी तसेच काही ठिकाणी रासायनिक पाणी मिसळत गेल्याने कल्याण खाडीत जाण्यापूर्वीच वालधुनी नदीला गटारगंगेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. नदीच्या पाण्याचा रंग आणि वास हे तिच्या प्रदूषणाची साक्ष देतात. नोव्हेंबर २०१७ मध्ये तर उल्हासनगर भागातील वालधुनीचे पाणी अतिदूषित रसायनांमुळे रक्तासारखे लाल दिसले होते. या गंभीर परिस्थितीमुळे स्थानिक लोकांना नदीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागला. एकेकाळची जीवनदायिनी असलेल्या वालधुनीचा दुर्दैवाने गटार म्हणून उल्लेख होऊ लागला.

वालधुनी नदीचे प्रदूषणाची करणे

1) वालधुनीच्या प्रदूषणामागे महत्त्वाचे कारण म्हणजे औद्योगिक सांडपाणी होय. अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखाने नियम धाब्यावर बसवत वर्षानुवर्षे प्रक्रिया न केलेले विषारी पाणी नदीत सोडत आहेत. परिणामी, नदीचे पाणी रसायनांनी प्रदूषित झाले आहे. प्रदूषणपातळी वेळोवेळी मर्यादेपेक्षा कितीतरी पटीने अधिक नोंदवली गेली आहे.

२) घरगुती सांडपाणी हा दुसरा मोठा घटक आहे. उल्हासनगरसारख्या शहरात अद्यापही संपूर्ण मलनिस्सारण व्यवस्था कार्यान्वित नसल्याने अनेक वसाहतींमधील नाले थेट वालधुनीला मिळतात. शहरे वाढली तसे नाल्यांचे जाळे वाढले अन् हे सर्व नाले अखेरीस वालधुनीकडे वळवण्यात आले. सुमारे शंभरच्या आसपास लहान-मोठे नाले, कारखान्यांचा कचरा आणि घरगुती सांडपाणी मिळून नदीचा प्रवाह सतत दुर्गंधीयुक्त राहतो.

३) तिसरा चिंताजनक घटक म्हणजे बाहेरील रासायनिक टँकरमधील अवशेष नदीत टाकण्याचे प्रकार होय. अनेक अवैध घटक रात्रीच्या अंधारात केमिकल टँकर साफ करण्यासाठी नदीचे किनारे शोधत असतात

वालधुनी नदीचा इतिहास

वालधुनी नदीचा उगम हा सह्याद्रीच्या रांगांतून तावली डोंगरातून वाहत वालधुनी नदी काकोळा गावाजवळ वाहत येते. इथे ब्रिटिशांनी रेल्वेसाठी लागणाऱ्या पाण्याकरीता बांधला जीआयपी टैंक प्रकल्प आहे. इथे आजही रेल नीर या नावाने रेल्वेचा बाटली बंद पाण्याचा प्रकल्प सुरू आहे. इथून रोज दोन लाख पाण्याच्या बाटल्या भरून विविध रेल्वे स्थानकात पाठवल्या जातात. आजदेखील त्या इथले पाणी पाणी हातात घेतले तर काचेसारखे स्वच्छ दिसते. आसपासच्या गावातील शेकडो कुटुंबसुद्धा कुठलीही प्रक्रिया न करता हे पाणी थेट पिण्यासाठी वापरत असतात.

वालधुनी नदीचा नाला कुठे होतो?

मात्र जसजसे ही वालधुनी नदी खाली अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात उतरत जाते, तसतशी ही नदी मरणप्राय होते. यात विविध रासायनिक कंपन्यांचे सांडपाणी, शहरातील सांडपाणी यामुळे ही नदी गटारगंगा होऊन जाते. नद्या किंवा पाण्याचे स्रोत, हवा, स्वच्छ राहावी यासाठी केंद्र आणि राज्य सरकारचा प्रदूषण नियंत्रण विभाग आहे. त्यांची कार्यालये विविध शहरांत आहेत. पण हे विभाग प्रदूषणाला आळा घालण्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. पर्यावरणाचे रक्षण करण्याऐवजी प्रदूषण करणाऱ्या यंत्रणेलाच पाठिशी घातले जात असल्याचा आरोप इथले स्थानिक नागरिक करतात. याला शहरातील नगरपालिका, महापालिका, सुरक्षा यंत्रणा सुद्धा तेवढ्याच जबाब असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.