गोंधळाचे वातावरण ; सॉफ्टवेअर मध्ये अडचण
अलिबाग (रत्नाकर पाटील)
संपूर्ण राज्यातील तब्बल नऊ हजार 435 कनिष्ठ महाविद्यालयांमधील इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी नोंदणी केलेल्या 12 लाख 71 हजार 201 विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्याचा पेपर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाला अवघड गेला आहे. अकरावीच्या प्रवेशाची पहिल्या नियमित फेरीची निवड यादी, महाविद्यालयांचा कट-ऑफ गुरुवारी जाहीर होणार होता. परंतु, संपूर्ण राज्यात अकरावीच्या ऑनलाइनद्वारे प्रवेशाचा हा भार डोईजड झाल्याने शिक्षण विभाग प्रवेशाच्या पहिल्याच परीक्षेत नापास झाला आहे.मोठ्या दिमाखात संपूर्ण राज्यात इयत्ता अकरावीच्या प्रवेशाची प्रक्रिया यंदा ऑनलाइनद्वारे राबविण्याची घोषणा करण्यात आली. परंतु, यापूर्वी केवळ पाच शहरांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाला ही प्रक्रिया संपूर्ण राज्यासाठी राबविण्याचे गणित जुळवता आले नाही. राज्यात नऊ हजार 435 कनिष्ठ महाविद्यालयांमधील 21 लाख 23 हजार 720 जागांसाठी आतापर्यंत 12 लाख 71 हजार 201 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेत कॅपअंतर्गत 16 लाख 60 हजार 84 जागा उपलब्ध आहेत, तर व्यवस्थापन कोट्याअंतर्गत चार लाख 63 हजार 636 जागा उपलब्ध आहेत.
ही प्रवेशाची प्रक्रिया ऑनलाइनद्वारे राबविण्यासाठी शिक्षण विभागाने निविदा मागविण्यात आल्या. यापूर्वी पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती या महापालिका क्षेत्रातील कनिष्ठ महाविद्यालयांमधील अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया गेल्या वर्षीपर्यंत यशस्वीरीत्या राबविणाऱ्या संबंधित एजन्सीने यंदा निविदा भरली नाही. त्यामुळे अन्य एजन्सीला यंदाचे संपूर्ण राज्यासाठीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्याबाबतच्या सॉफ्टवेअरचे कामकाज सोपविण्यात आले. परंतु, सुरुवातीपासूनच या सॉफ्टवेअरमध्ये अडचणींचे सत्र सुरू झाले. अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थी नोंदणी सुरू झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच संबंधित संकेतस्थळ बंद पडले. ही तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी काही दिवस लागले.त्यानंतर विद्यार्थी नोंदणीची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली. त्यानंतर आता पहिल्या नियमित फेरीतील निवड यादी जाहीर करताना, सगळे कामकाज झाल्यानंतर आता संपूर्ण राज्यातील महाविद्यालयांचा कट-ऑफ सॉफ्टवेअरमध्ये दिसत नसल्याची तांत्रिक अडचण उद्भवली आहे. ती सोडविण्याचा प्रयत्न शिक्षण विभागामार्फत सुरू आहे. त्यामुळे पहिल्या नियमित फेरीची गुणवत्ता यादी, निवड यादी गुरुवारी जाहीर होऊ शकलेली नाही, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न घेण्याच्या अटीवरून सांगितले.
दरम्यान, इयत्ता दहावीचा निकाल जाहीर होऊन दीड महिना उलटून गेला तरीही अद्याप अकरावीच्या प्रवेशाची पहिली यादी जाहीर न झाल्याने पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. अकरावीच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केल्यानंतर, त्यात अडचणी येत असून ते वेळापत्रक कोलमडत आहे. त्यामुळे राज्यातील लाखो विद्यार्थी-पालकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. याशिवाय नियोजित पद्धतीने प्रवेश प्रक्रिया होत नसल्याने गोंधळलेल्या पालकांना शिक्षण विभागाकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्याने पालक अकरावीच्या प्रवेशाबाबत संभ्रमावस्थेत आहेत.
Social Plugin