कार्यरत कर्मचाऱ्यांवर रुग्णसेवेचा ताण
अलिबाग (रत्नाकर पाटील)
रायगड जिल्ह्यातील तळागाळातील घटकाला चांगली आरोग्यसेवा देण्याचा दावा रुग्ण प्रशासनाकडून कायमच केला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यांसह दंतचिकित्सक, परिचारिका, प्रशासन अधिकारी, अधिपरिचारिका अशी एकूण शंभरहून अधिक पदे रिक्त असल्याचे उघड झाली आहे. त्यामुळे कार्यरत डॉक्टर, कर्मचाऱ्यांच्या भरोवशावर रुग्णालयाचा कारभार चालत असून, त्यांच्यावर कामाचा ताण पडत आहे. रुग्णालयात कंत्राटी कर्मचारी भरण्यावर अधिक भर दिला जात नसल्याने शिक्षण घेतलेले अनेक बेरोजगार तरुण तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहेत. आरोग्य विभागाचा सावळागोंधळ यातून दिसून येत आहे.
अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालय 1980-81 या कालावधीत उभारले. तीन मजली असलेल्या इमारतीमध्ये 250 खाटांचे रुग्णालय आहे. या रुग्णालयात दर दिवशी सुमारे 600हून अधिक रुग्ण बाह्यरुग्ण कक्षामध्ये उपचारासाठी येतात. पोलादपूरच्या टोकापासून पनवेल, उरण अशा अनेक तालुक्यांतील शहरी व ग्रामीण भागातील रुग्ण अलिबागमधील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येतात. जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालयातदेखील रुग्ण उपचारासाठी जातात. रुग्णालयांमध्ये चांगली सेवा मिळेल या आशेने जाणाऱ्या रुग्णांची घोर निराशा होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील रुग्णालयातील अनेक पदे भरली नाहीत. रिक्त पदांचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. रुग्णांना चांगली सेवा देण्याच्या बाता मात्र कागदावर असल्याचे दिसून येत आहे. अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातील कनिष्ठ लिपीक, प्रयोगशाळा सहाय्यक, ग्रंथपाल, दंत आरोग्यक, तज्ज्ञ डॉक्टर नसल्याचे सांगून तेथील कर्मचारी अधिक उपचारासाठी खासगी अथवा मुंबईमधील दवाखान्यात पाठवितात. या प्रकारामुळे सर्वसामान्य रुग्णांची अनेकवेळा परवडत होत आहे. अलिबाग येथील जिल्हा सामान्या रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून तज्ज्ञ डॉक्टरांसह नियमित परिचारिकांची भरती न केल्याने कंत्राटी डॉक्टर, परिचारिकांच्या भरोवशावर कारभार चालत आहे. जिल्हा रुग्णालयात वर्ग एकचे अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, निवासी वैद्यकिय अधिकारी, शस्त्रक्रिया, स्त्रिरोग, बालरोग, अस्थिव्यंग, बधिरीकरण, क्ष किरण, शरीर विकृती, मनोविकृती चर्मरोग, नेत्ररोग, कान, नाक, घसा यांचे वैद्यकीय अधिकारी, दंतशल्यचिकित्सकांसह मनोविकृती चिकित्सक अशी एकूण 18 पदे रिक्त आहेत. तसेच वर्ग दोनचे नेत्र शल्यचिकित्सक, बधिरीकरण तज्ज्ञ,अस्थिव्यंग चिकित्सक, क्ष किरण शास्त्रज्ञ व वैद्यकीय अधिकारी, दंतशल्यचिकित्सकची सहा पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयात काम करणाऱ्या अधिसेविका, आरोग्य परिचारिका, सिस्टर टयुटर, उपप्राचार्य, अधिपरिचारिका, शुश्रुषा अधिकारी, मनोविकृती परिचारिका यांची 47 पदे गेल्या अनेक वर्षापासून रिक्त आहेत. रिक्त पदांचा रुग्णांच्या सेवेवर परिणाम होत आहे. तज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांना त्या आजारावरील रुग्णांवर वेळेवर उपचार होत नाही. शिकाऊ अथवा कंत्राटी डॉक्टरांच्या भरोवश्यावर रुग्णांना सेवा मिळत असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल होत आहे.
रिक्त पदांवर दृष्टीक्षेप
पदे मंजूर भरलेली रिक्त
तज्ज्ञ डॉक्टर
52 28 24
आरोग्य परिचारिका 6 01 05
अधिपरिचारिका
96 90 06
सिस्टर ट्युटर
19 06 13
क्लीनिकल इन्स्ट्रक्टर
02 00 02
शुश्रुषा अधिकारी
01 00 01
प्राचार्य
01 00 01
उपप्राचार्य
01 00 01
मनोविकृती परिचारिका
03 00 03
कनिष्ठ लिपिक 06 02 04
नेत्रचिकित्सा अधिकारी 12 09 03
स्वच्छता निरीक्षक 01 00 01
वरिष्ठ लिपीक 05 03 02
नियमित भरतीचा अभाव
अलिबागमधील जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालयात वर्ग दोनचे 50 कंत्राटी वैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती करण्यात आली आहे. तसेच बालरुग्ण परिचारिकांपासून, परिसेविकांची 90 पदे भरण्यात आली. त्यामध्ये 24 पदे कंत्राटी भरण्यात आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णालयांमध्ये 74 कंत्राटी अधिकारी व कर्मचारी कार्यरत असल्याची माहिती आकडेवारीनुसार दिसून येत आहे. तुटपुंज्या मानधनावर कंत्राटी कर्मचारी काम करीत आहेत. ते मानधन वेळेवरही मिळत नाही. आरोग्य विभागाच्या सेवेवर त्याचा परिणाम होत आहे. नियमित भरतीचा अभाव आरोग्य विभागात असल्याने हा प्रकार होत असल्याची चर्चा आहे.
अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयातील सात, पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयातील एक, माणगाव उपजिल्हा रुग्णालयातील चार, पेण व कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील प्रत्येकी दोन, खालापूर तालुक्यातील चौक येथील ग्रामीण रुग्णालयामधील एक, महाडमधील ग्रामीण रुग्णालयातील दोन या रुग्णालयांमध्ये वर्ग दोनचे 24 वैद्यकीय अधिकारी अनधिकृत गैरहजर आहेत. यातील काहींनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने रुग्णांना सेवा मिळताना अडचण होत असल्याची चर्चा आहे.
Social Plugin