पाटण ( दिनकर वाईकर )
चालूवर्षी मे महिन्यापासूनच पाऊस सुरू झाला असून अद्यापही पाऊस न थांबल्याने पाटण विधानसभा मतदारसंघातील बहुसंख्य शेतकऱ्यांना आपल्या शेतीत पेरणीच करता आली नाही. याशिवाय ज्यांनी पेरणी केली त्यांचेही पावसाने पूर्णपणे नुकसान केले आहे. त्यामुळे पेरणी न झालेल्या शेतकऱ्यांचे सर्वेक्षण व पेरणी करूनही नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या शेती नुकसानीचे पंचनामे करून पाटण मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी भाजपाचे पाटण विधानसभा मतदारसंघाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी एका निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचेकडे केली आहे.
या निवेदनात सत्यजितसिंह पाटणकर यांनी पुढे म्हटले आहे की, पाटण विधानसभा मतदारसंघात सध्या सर्वत्रच ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. मतदारसंघांमध्ये सरासरी जूनमध्ये थोड्या पावसाला सुरुवात होते तर जुलै, ऑगस्टमध्ये मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. यावर्षी मे महिन्यापासूनच मोठ्या प्रमाणावर पाऊस सुरू झाला आणि आता जून महिना संपत आला तरी पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. वास्तविक सुरुवातीच्या पावसानंतर लगेचच स्थानिक शेतकरी आपल्या शेतामध्ये पिकांची पेरणी, मशागत करतात परंतु सातत्याने पाऊस पडत असल्याने यावर्षी मतदारसंघात शेतकऱ्यांच्या अद्याप पेरण्याच होऊ शकल्या नाहीत आणि यापुढे त्या पेरण्या होतील याची शक्यता नाही. या गंभीर परिस्थितीचा विचार करून पाटण मतदारसंघासाठी आपण ओला दुष्काळ जाहीर करावा अशी आम्हा सर्वांची मागणी आहे.
पाटण मतदारसंघाला त्यागाची परंपरा आहे, महाराष्ट्राची वरदायीनी असलेल्या स्थानिक कोयनेसह अन्य छोट्या मोठ्या धरणातील पाण्यामुळे निम्म्याहून अधिक महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व प्रकाशमय झाला आहे. सिंचनासह राज्याला प्रकाश देण्यातही या स्थानिक जनतेचा फार मोठा वाटा आहे. जलविद्युतसह अपारंपारिक ऊर्जा देणारा पवनचक्क्या प्रकल्प असो अथवा पर्यावरण रक्षणासाठी कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, पश्चिम घाट प्रकल्प इको सेन्सिटिव्ह झोन या माध्यमातून या स्थानिक जनतेने राज्याला भरभरून दिले आहे. स्थानिक गोरगरीब शेतकरी हा पूर्णपणे आपल्या शेतीवर अवलंबून असतो, पूर्णपणे डोंगर पठारावर असणारी पारंपारिक शेती यावर्षी पावसामुळे पूर्णपणे अडचणीत आल्याने स्थानिक शेतकरी हवालदिल झाला आहे. सातत्याने सुरू असलेल्या पावसामुळे स्थानिक शेतीविषयी सरासरीचा विचार करता जवळपास पन्नास टक्केंहून अधिक शेतकऱ्यांनी पेरणी केलेली नाही, यासाठी संबंधित विभागांकडून अशा शेतींचे सर्वेक्षण करण्यात यावे. ज्यांनी काही प्रमाणात पेरणी केली परंतु पावसामुळे त्यांचें पूर्णपणे नुकसान झाले अशा शेतीचेही पंचनामे करण्यात यावेत व त्यांना नुकसान भरपाईची तरतूद शासनाकडून करण्यात यावी.
आजपर्यंतच्या त्यागाची व सध्याच्या नैसर्गिक संकटाची दखल घेऊन आपण आम्हा स्थानिकांच्या या मागणीचा गांभीर्याने विचार करून लवकरात लवकर पाटण मतदारसंघात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी विनंती सत्यजितसिंह पाटणकर यांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती कृषी मंत्री महाराष्ट्र शासन, विभागीय आयुक्त पुणे, जिल्हाधिकारी सातारा, उप विभागीय अधिकारी व तहसीलदार पाटण यांनाही देण्यात आल्या आहेत.
Social Plugin