दुधगाव, ता. मिरज : देशभक्ती आणि अभिमान व्यक्त करणाऱ्या कर्मवीर चौकातील झेंडा कट्ट्याजवळ सध्या अत्यंत अस्वच्छ परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर कचरा साचलेला असून त्याची कुणीही दखल घेत नसल्याचे दिसून येत आहे.
या ठिकाणी झेंड्याचा खांब असून, ‘जय हिंद’ असा संदेश देणारा फलक आहे. मात्र, त्याच्या आजूबाजूला प्लास्टिक बाटल्या, अन्नाचे अवशेष, भाजीपाला आणि अन्य कचरा टाकलेला आहे. त्यामुळे या राष्ट्रीय प्रतीकाच्या आसपास अस्वच्छतेचा विटाळ होत आहे.
हा परिसर गावातील मध्यवर्ती आणि प्रमुख ठिकाणी असून, याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना ही दृश्ये लज्जास्पद वाटत आहेत. गावाच्या स्वच्छतेसाठी केले जाणारे प्रयत्न या ठिकाणी फेल ठरत आहेत, हे चित्र यातून दिसून येते.स्थानिक प्रशासनाने या ठिकाणी स्वच्छतेसाठी तात्काळ पावले उचलावीत, तसेच नागरिकांनीही अशा पवित्र स्थळी कचरा टाकू नये, हीच अपेक्षा आहे.
Social Plugin