Ticker

6/recent/ticker-posts

न्यायालयाच्या लोकअभिरक्षक कार्यालयाच्या" माध्यमातून सातारा कारागृहातील बंदयांसाठी कायदेविषयक मोफत मार्गदर्शन शिबिर



 बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

सातारा जिल्हा कारागृह येथे मा.प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा श्रीमती सुरेखा कोसमकर यांच्या आदेशाने, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव तथा न्यायाधीश मा.नीना बेदरकर यांच्या मार्गदर्शनाखाली कारागृहातील बंदयांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर घेण्यात आले.

शिबिरामध्ये बंदयांना त्यांचे हक्क, कर्तव्ये याची माहिती देण्यात आली. कारागृहातील ज्या बंदयांना त्यांच्या कायदेशीर केसेस लढण्याकरिता वकील नाहीत, त्यांच्यासाठी सरकारतर्फे मोफत वकील देण्याची तरतूद नियमात आहे. त्यानुसार ज्या बंदयांना वकील नाहीत, त्यांची नावे नोंद करून त्यांना सरकारी वकील देण्याची तरतूद करण्यात आली. तसेच ज्या बंदयांची नातेवाईकांची मुलाखत येत नाही, त्यांच्यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्यामार्फत मदत करून त्यांच्या भेटी घडवण्याबाबत कारवाई करण्यात आली.

सातारा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत लोकअभिरक्षक कार्यालयाची स्थापना करण्यात आली असून यामध्ये बंदी व त्यांचे नातेवाईक यांना मोफत कायदेशीर मदत देण्याची तरतूद आहे. याबाबत देखील बंदयांचे नातेवाईक मुलाखतीसाठी आलेले असताना त्या ठिकाणी मा. सचिव तथा न्यायाधीश श्रीमती बेदरकर यांनी बंदयांच्या नातेवाईकांना माहिती दिली.

लोकअभिरक्षक कार्यालयामार्फत न्यायाधीन बंदयांना मोफत विधी सेवा व सहाय्य पुरवणे, बंदयांच्या समस्या सोडवण्यास मदत करणे, महिला, आर्थिक दुर्बल घटक, अनुसूचित जाती, जमाती घटकांमधील आरोपींसाठी मोफत वकिलांची नेमणूक करणे, बंदयांना कायदेविषयक सल्ला व मार्गदर्शन करणे, त्यांच्या फौजदारी खटल्याचे कामकाज मोफत चालविणे, अटकेपूर्वी पोलीस स्टेशन येथे आरोपींना मोफत विधी सहाय्य देणे, अटक झाल्यानंतर कोर्टासमोर आरोपीस हजर करते वेळी मोफत विधी सहाय्य देणे, शिक्षाधीन बंदयांना अपील करण्यासाठी मोफत विधी सहाय्य करणे, महिला बंदयांच्या समस्यांचे निवारण करणे इत्यादी कामे सदर लोकअभिरक्षक कार्यालयामार्फत सातारा कारागृहात करण्यात येत आहेत.सदर लोक अभिरक्षक कार्यालय सातारा यांचा दूरध्वनी क्रमांक 02162 - 298299  व  email - sataraladcs@gmail.com असा आहे.

सदर कार्यक्रमास मा. सचिव तथा न्यायाधीश निना बेदरकर, कारागृह अधीक्षक शामकांत शेडगे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी सतीश कदम, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे वकील श्रीमती अमृता ताठे, वकील श्री यश घोडसंगी तसेच इतर कर्मचारी व बंदी उपस्थित होते.