वैभव सोळंके/तालुका प्रतिनिधी
13 डिसेंबर/माजलगाव
महा.राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ माजलगावच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिका,पंचायत समिती समोर येथे भारतीय संविधानाच्या 75 व्या अमृत महोत्सवानिमित्त लाऊड स्पीकर वरून दि.14 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीत रोज सायंकाळी 7:00 वाजता ‘संविधान वाचन पंधरवाडा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संविधानाबाबत जनजागृती वाढवणे, संविधानिक मूल्ये समाजात रुजवणे आणि लोकशाहीची जाणीव बळकट करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.
या संविधान वाचन पंधरवाडा कार्यक्रमाचे उदघाटक राहुल सूर्यतळ,पोलीस निरीक्षक माजलगाव.अध्यक्ष भारत टाकणखार जिल्हा संघटन प्रमुख कास्ट्राईब तर प्रमुख पाहुणे सूर्यकांत जोगदंड,बाळासाहेब सोनवणे हे असणार आहेत.हा संपूर्ण कार्यक्रम नूरखा पठाण लिखित “आपले संविधान : राज्यपद्धती नव्हे तर जीवनपद्धती” या पुस्तकातील अनुच्छेद 1 ते 51 पर्यंतचे वाचन करण्यावर आधारित आहे.या अनुच्छेदाचे वाचन विविध मान्यवर वक्त्यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. संविधानातील मूलभूत अधिकार,राज्याच्या मार्गदर्शक तत्त्वे व नागरिकांची कर्तव्ये यांचे सखोल वाचन व चिंतन या उपक्रमातून घडणार आहे.
यासोबतच संविधानाच्या मूल्यांवर आधारित कवी संमेलन महाराष्ट्राचे प्रख्यात कवी प्रभाकर साळेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असून यामध्ये परिसरातील अनेक कवी,कवयित्री सहभागी होणार असून ते आपल्या कवितांतून स्वातंत्र्य,समता,बंधुता, न्याय आणि लोकशाही या संविधानिक संकल्पनांचे प्रभावी सादरीकरण करणार आहेत. तसेच कवी संमेलनाचे सूत्रसंचालन ना.मा. पडलवार हे करणार आहेत. संविधानाला केवळ कायद्याचा ग्रंथ न मानता जीवनपद्धती म्हणून स्वीकार करण्याचा संदेश देणारा हा महत्त्वपूर्ण कार्यक्रम असून या पंधरवड्यात जास्तीत जास्त या कर्मचारी,विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानप्रेमी नागरिकांनी सहभागी संविधानिक मूल्यांचे संवर्धन करावे असे आवाहन निमंत्रक तथा कास्ट्राईब तालुकाध्यक्ष राहुल टाकणखार व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.





Social Plugin