बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]

शाळेला नाताळच्या सणासाठी आणि जोडून आलेल्या शनिवारी अशा तीन दिवसाच्या सुट्ट्या होत्या आणि सण म्हटलं की सुट्टीला आम्ही गावाकडे जाणार. गावी निघालो होतो गाडीचा प्रवास चालूच होता आणि प्रवासात अचानक फोनची रिंग वाजली नाव पाहिल्यावर थोडीशी धास्ती वाटली कारण नाव पण तसंच होतं भराडे मॅडम गटशिक्षणाधिकारी खटाव तालुका.  नेहमीप्रमाणे  असंच वाटलं की, सरांकडे काम असेल त्यामुळे मॅडमने काहीतरी निरोप सांगण्यासाठी फोन केला असेल परंतु मॅडम म्हणाल्या वर्षा मॅडम अजित सरांकडे आणि तुमच्याकडे एक जबाबदारी द्यायची आहे.आता मॅडम आणि त्यांनी सांगितलेली जबाबदारी म्हटलं की ऐकण्या अगोदरच काळजात जरा धस्स झालं पण तरीही भीतच त्यांना बर ठीक आहे. सांगा काय आहे ते? असं म्हटलं तेव्हा मॅडम म्हणाल्या की, राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनी बालेवाडी पुणे या ठिकाणी भरणार आहे. त्या ठिकाणी देशाच्या सर्व राज्यांमधून  मोठमोठे स्टॉल लागणार आहेत. यामध्ये महाराष्ट्र शासनाने आपल्याला जिल्हा परिषद शाळेच्या वतीने एक प्रातिनिधिक स्टॉल लावण्याची संधी दिली आहे. आणि तिथे आपल्याला ज्ञानरचनावादी वर्गरचनेचा स्टॉल लावायचा आहे. त्यासाठी आपल्याकडे वेळही फार कमी आहे. एका दिवसानंतर प्रदर्शनी सुरू होत आहे.त्यामुळे उद्याच्या दिवसभरात सर्व तयारी करा. तुमच्या सोबत कोण घ्यायचे ते ठरवा आणि कामाला लागा. फोन ठेवला आणि आमची गाडी पुन्हा पुसेगावच्या दिशेने वळवून आम्ही परतीचा प्रवास सुरू केला.अर्थातच अशा कमी वेळेतही योग्य प्रकारचे नियोजन अजित चव्हाण सर नक्की करतील असा त्यांना विश्वास होता परंतु माझ्याकडे तसे विशेष काहीही कौशल्य नसताना मला त्यांनी निवडलं तरी कसं हा प्रश्न मात्र माझ्या मनात सतत घोळत होता. परंतु प्रत्येक विद्यार्थ्यातील सुप्त गुण ओळखून त्यांना त्यांचा विकास करायला लावणाऱ्या मॅडमच्या नजरेला कदाचित माझ्यातील एखादा सुप्त गुण दिसला असेल. ढाणे मॅडम, सुतार मॅडम आणि अजित चव्हाण सर, दत्तात्रय गोरे सर व मी, सर्वजण कामाला लागलो. फ्लेक्स तयार करणे,साहित्य गोळा करणे अशी सर्व तयारी करून पुण्याचा मार्ग धरला. बालेवाडी येथे पोहोचल्यानंतर प्रदर्शनी ज्या ठिकाणी भरणार होती तेथे आत मध्ये प्रवेश केला तेव्हा मनावरील ताण आणखीनच वाढला. एवढ्या मोठ्या प्रशस्त ठिकाणी छोटे - छोटे बाल वैज्ञानिक जिथे आपले रचनाबद्ध असे प्रयोग साहित्य घेऊन आले होते अशा ठिकाणी आपण पोती भरून आणलेलं साहित्य आत मध्ये आणायचं तरी कसं , बरं आणलंच आणि आत मध्ये लावलंच तरी अशा ठिकाणी आपला निभाव लागेल का? आपण खेडेगावातून आलेली माणसं. हिंदी आणि मराठी वरचे जेमतेम  आणि इथे मात्र पूर्ण देशभरातून आलेले वैज्ञानिक आणि त्यांच्याबरोबर आले त्यांचे तज्ञ मार्गदर्शक गुरुजनवर्ग. किती विरोधाभास होता या सर्व गोष्टींमध्ये. खरंतर सर्व तयारीच्या नादामध्ये आम्हाला निघायला थोडा उशीरच झाला होता. त्यामुळे पोहोचलो ही अगदी सर्व काही बंद व्हायच्या वेळेला. आत मध्ये गेल्यावर आमच्या अनोळखी नजरा इकडे तिकडे फक्त काहीतरी शोधत होत्या. काय शोधत होतो हे मात्र कोणालाही माहित नव्हतं आणि तेवढ्यात अचानक एक आवाज आला *तुम्ही प्रतिभाची मुलं का* ? अरे किती उशीर केलात. मी केव्हापासून वाट पाहते तुमची. मला प्रतिभाचा फोन आला होता. तुमची सगळी व्यवस्था केलेली आहे. मग त्यांनी आम्हाला आमचा स्टॉल दाखवला,  साहित्य उतरवण्यासाठी जर मदत हवी असेल तर हवी ती मदत घ्या असे सांगून SCRT संचालिका  डॉ.नेहा बेलसरे मॅडम यांनी आमच्या कामाला सुरुवात करून दिली. चक्क नेहा बेलसरे मॅडम आमची वाट पाहत होत्या,  आमच्या सोबत संवाद साधत होत्या, आमची सतत विचारपूस करत होत्या हे खूपच आश्चर्यकारक होतं पण हे सगळं भराडे मॅडम यांच्यामुळेच शक्य आहे याची जाणीव होतीच. तिथून पुढे जोपर्यंत आम्ही तेथे होतो तोपर्यंत त्या वरचेवर आमच्याकडे येऊन आमची चौकशी करायच्या खरंच मोठ्यातील मोठेपण तेव्हा आम्ही प्रत्येक पावलावर अनुभवत होतो. 

साहित्य मांडणीला सुरुवात तर झाली पण आता प्रश्न होता तो राहण्याचा. याच्यावरही भराडे मॅडम कडे लगेचच उत्तर तयार होतं.. त्यांचीच मैत्रीण भोर तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी सोनावणे मॅडम  यांच्या घरी आमच्या राहण्याची सोय करण्यात आली होती. साहित्य मांडणी झाली, राहण्याची व्यवस्था झाली पण आमच्या तिघींच्याही मनात आता एक नवीन प्रश्न उभा होता तो म्हणजे उद्याचा . जे लोक भेट देण्यासाठी येतील यामध्ये मोठमोठ्या अधिकारी वर्गापासून ते अगदी पुण्यातील विविध माध्यमांच्या शाळेतील पालक वर्ग विद्यार्थ्यापर्यंत सर्व लोक असणार. या  सर्वांपर्यंत आपले म्हणने पोहोचवण्यात आपण यशस्वी तर होऊ ना?  आपल्यामुळे प्रोजेक्ट फेल तर नाही ना जाणार?  आपल्यावर टाकलेला विश्वास आपण सार्थ करू शकू ना? अनेक एक प्रश्न मनात होते आणि असेच प्रश्न मनात घेऊन आम्ही  भराडे मॅडम मॅडमला फोन लावला आमच्या कामाचे स्वरूप समजावून दिल्यानंतर मॅडमने शेवटी एक आश्वासक शब्द सांगितला तो म्हणजे, तुम्ही सर्व छानच कराल. बस त्या एका शब्दांनीच आम्हाला किती बळ मिळालं म्हणून सांगू. दुसऱ्या दिवशी उठून आम्ही आमच्या स्टॉलवर गेलो शैक्षणिक साहित्य आणि भरलेला स्टॉल म्हणजे जनू आमची वर्गखोलीच वाटत होती. प्रत्यक्ष आपण वर्गातच प्रवेश केलाय असं वाटू लागल आणि आता वेगवेगळे अधिकारी विद्यार्थी यांच्या भेटी होऊ लागल्या स्वप्नातही ज्या लोकांना आपण पाहू असं वाटणार नाही असे सर्व अधिकारी विद्यार्थी हे भेटीसाठी येत होते. भारत सरकारचे केंद्रीय शिक्षण सचिव, राज्य सरकारचे शिक्षण सचिव शिक्षण संचालक, सर्व विभागांचे उपसंचालक, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी, अनेक शिक्षण तज्ञ भेट देऊ लागले. आमचा जिल्हा परिषद शाळेचा एकमेव स्टॉल असल्याने सर्वांना खूप कौतुक वाटत होते. आमची तोंड भरून स्तुती  करत होते. आमच्यातील प्रत्येक उपक्रम समजावून घेत होते. कुणी फोटो काढून नेत, कोणी व्हिडिओ काढून नेत होते. लहान मुलं तर प्रत्यक्ष कृतींचा आनंद घेत होती. आम्हालाही अशाच प्रकारच्या शाळेत शिकायला आवडेल असं आनंदाने सांगत होते आणि ते पाहून दर दिवशी आम्ही  भारावलेल्या अंतकरणाने घरी परत जात होतो. खरंच या ठिकाणी आपण स्वप्नातही जाण्याचा विचार केला नसेल अशा ठिकाणी प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मॅडम मुळे आम्हाला प्राप्त झाली. त्याचबरोबर ज्यांनी निरपेक्षपणे आम्हाला सहा दिवस राहण्यासाठी स्वतःच्या घरात आसरा दिला आम्हाला काय हवय नको हवं नको याची अगदी आपुलकीने चौकशी केली अशा गटशिक्षणाधिकारी सोनवणे  मॅडम. स्वतःच्या हाताने आम्हाला स्वतः तयार केलेली खिचडी खाऊ घालणारे त्यांचे बाबा, आमची दररोज हसतमुखाने चौकशी करणाऱ्या बेलसरे मॅडम, ज्ञानरचनावादी वर्ग रचना म्हणजे नेमके काय हे जाणून घेणाऱ्या अगदी वयस्कर अशा त्यांच्या आई .अगदी तीन महिन्याने रिटायर होणाऱ्या परंतु आम्हा तरुण पिढीला ही लाजवेल असा उत्साह असणाऱ्या आमच्या ढाणे मॅडम आणि सतत नवनवीन शैक्षणिक साहित्य तयार करणाऱ्या उपक्रमशील शिक्षिका   सुतार मॅडम सर्वांकडूनच खूप काही शिकायला मिळाले.

 या सर्व गोष्टींची संधी मिळवून देणाऱ्या आमच्या आदरणीय गटशिक्षणाधिकारी प्रतिभाताई भराडे मॅडम सर्वांकडूनच घ्यावे तेवढे थोडेच.

 माझी यापूर्वीची शाळा म्हणजेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बेघर वस्ती पुसेगाव या ठिकाणी मी कार्यरत होते तेव्हा देखील असाच एका सकाळी मॅडमचा फोन आला आणि म्हटल्या मॅडम जवळच्या वीट भट्टीवरील मुले शिक्षणात सामावून घेणे गरजेचे आहे त्यासाठी नियोजन करा. मग मॅडमच्या मार्गदर्शनाखाली मी व माझ्या सहकारी शिक्षिका मेघा शेवाळे मॅडम त्या मुलांना स्वतः सकाळी आणायला आणि संध्याकाळी सोडायला जाणे असे नियोजन करून त्या मुलांना नियमितपणे शाळेत उपस्थित ठेवू लागलो. अगदी त्याचप्रमाणे माझी आत्ताची शाळा फडतरवाडी नेर या ठिकाणी देखील दाखल असणारी पारधी समाजाची काही मुले नियमित शाळेत येत नव्हते आम्ही माझ्या सहकारी शिक्षिका जाधव मॅडम शिरोळे मॅडम यांनी सतत पालक भेटी देऊन आता खरचच ती मुले नियमित शाळेत येऊ लागली आहेत. सुरुवातीला लाजरी बुजरी असणारी ही मुले आता सर्वांसोबत सहजपणे बोलू लागली आहे खरंच प्रत्येक मूल शिकू शकत या एका प्रेरणेने सर्वांना कार्यरत ठेवणाऱ्या अगदी आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी इयत्ता पहिलीच्या वर्ग शिक्षकांचे स्वतः प्रशिक्षण घेणाऱ्या प्रत्येक संकल्पना प्रत्येक विषय प्रत्येक मुलाला कशा प्रकारे शिकवला जावा हे स्वतः शिकवणाऱ्या आणि अगदी सेवानिवृत्तीच्या वाटेवर असताना देखील मी निवृत्त होत नाही तर फक्त माझ्या कामात बदल होतोय असे प्रेरणादायी शब्द सतत ज्यांच्या ओठी असतात अशा भराडे मॅडम आपण आपले व्यक्तिमत्व आम्हाला सदैव प्रेरणादायी असेच राहील. आपला हा प्रतिभास्पर्श नोकरीच्या शेवटच्या दिवसापर्यंत निरंतर ऊर्जा देत राहील हे निश्चित.


 लेखन
 वर्षाराणी शिवाजी भोसले 
 जिल्हा परिषद प्राथमिक शाळा 
फडतरवाडी (नेर) ता. खटाव जि. सातारा