बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
समाजातील शिक्षण व सहकारी संस्था ह्या पक्षीय राजकारणाची केंद्र नसतात तर त्या लोककल्याणाच्या वेदी असतात. उद्याच्या पिढ्या उज्वल करण्याचे सामर्थ्य त्यांच्याकडे असते. सध्या अतिरेकी चंगळवादामुळे तरुणाई दिशाहीन होत चालली आहे. मूल्यहीन राजकारणामुळे शेती, शिक्षण,रोजगार हे प्रश्न बाजूला पडले आहेत. अशा काळात समाजाला प्रगतीची प्रकाश वाट दाखविणारे हिंदी अध्यापक मंडळ हे दीपस्तंभाप्रमाणे कार्य करत आहे असे गौरवोद्गार प्राचार्य डॉ.यशवंत पाटणे यांनी काढले.
जिल्हा हिंदी अध्यापक मंडळ व राष्ट्रभाषानुरागी शिक्षक पतसंस्थेच्या संयुक्त विद्यमाने संभाजीनगर,सातारा येथील राष्ट्रभाषा भवनात आयोजित करणेत आलेल्या सत्कार व पुरस्कार वितरण कार्यक्रमात अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. डाॅ.पाटणे पुढे म्हणाले, ध्येयवादी शिक्षक आणि गुणवान विद्यार्थी हे राष्ट्राचे खरे वैभव आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी गुणवत्तेला पर्याय नाही. हिंदी अध्यापक मंडळ आणि त्यांची राष्ट्राभाषानुरागी शिक्षक पतसंस्था ही गुणवत्ता वाढीसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करून यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव करते. संस्थेचे ‘राष्ट्रभाषा भवन’ हे भारतीय संस्कृतीचे सुंदर संस्कारपीठ आहे. समाज आणि संस्कृती गौरवशाली करण्यासाठी हिंदी मंडळ करत असलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे साताराच्या सामाजिक वनीकरण विभागाचे वनाधिकारी हरिश्चंद्र वाघमोडे होते तर शारीरिक शिक्षक महासंघाचे अध्यक्ष आर वाय जाधव, महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे सचिव रामानंद पुजारी, सांगली जिल्हा हिंदी अध्यापक मंडळाचे सचिव आप्पासो पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांचे हस्ते सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन संपन्न झाले. मंडळाच्या गीतमंचाने ईशस्तवन व स्वागत गीत सदर केले. मंडळ व पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते शाल, श्रीफळ,स्नेह्वस्त्र,सम्मानचिहन व पुस्तके देवून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
मंडळाचे अध्यक्ष ता.का.सूर्यवंशी यांनी आपल्या प्रास्ताविकमध्ये हिंदी अध्यापक मंडळ व सहयोगी संस्थांच्या कामाचा परिचय करुन दिला व कार्यक्रमात दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे माहिती दिली.कार्यक्रमात आर वाय जाधव यांचा विशेष सत्कार करणेत आला. दिपाली पवार,आशा रसाळ व इरफाना फरास या उपक्रमशील शिक्षिकेंना गौरवण्यात आले. दादा बनसोडे, विठ्ठल निकाळजे व आ.तु. पाटील या शिक्षकांचा मुख्याध्यापक पदी बढती प्रीत्यर्थ सत्कार करणेत आला.
पतसंस्थेच्या ५ वी -८वी शिष्यवृत्ती धारक, १०वी व १२वी बोर्ड परीक्षेतील गुणवंत पाल्य व सेवानिवृत्त सभासद अशा ५९ विद्यार्थी व शिक्षकांना सन्मानित करणेत आले. हिंदी अध्यापक मंडळाचे राष्ट्रभाषा प्रचार-प्रसार २४, महामंडळ संचालित हिंदी परीक्षेंचे प्रथम तीन क्रमांकाचे विद्यार्थी पुरस्कार, माध्यमिक व उच्च माध्यमिकचे हिंदी विषयात उच्चतम गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे पुरस्कार असे सर्व २१७ पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी प्रमुखातिथी हरिश्चंद्र वाघमोडे यांनी आपल्या भाषणामध्ये मंडळाच्या कार्याचा गौरव करून स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम करण्याची आवश्यकता प्रतिपादित केली.आर.वाय.जाधव, रामानंद पुजारी, शाहनवाज मुजावर, हणमंत सूर्यवंशी,विजय यादव यानीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमास इकबाल मुल्ला, शिवाजीराव खामकर, सुधाकर माने, अनंत यादव, विभा साबळे,रवींद्र सानप स्वाती जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
विश्वनाथ नलावडे यांनी सर्वांचे आभार मानले. राष्ट्रीयगान वंदेमातरम ने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिनाक्षी बडीगार,राजू सय्यद,विजयकुमार पिसाळ यांनी उत्तम प्रकारे केले. कार्यक्रम यशस्वी करणेसाठी सागर पाटील,दीपक जाधव,एस.के.चव्हाण, नवनाथ कदम,संजय शिंदे,जुबेर बोरगावकर,व्यवस्थापक नवनाथ शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.कार्यक्रमास हिंदी शिक्षक,पतसंस्था सभासद, विद्यार्थी त्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





Social Plugin