Ticker

6/recent/ticker-posts

उन्हाळी सुट्टी शिबीर आयोजित

 


बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]

 महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत असणाऱ्या कृषी तंत्र विज्ञान केंद्र बोरगाव ता.सातारा येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद सातारा जिल्हा यांच्यावतीने उन्हाळी सुट्टी शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये ३५ ते ४० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. शनिवार, रविवार आणि सोमवार या  तीन दिवसांच्या शिबिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी बोरगाव मधील पाटेश्वरनगर येथील ममता मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स या दूध डेअरी ला भेट देऊन दुग्धजन्य पदार्थ कशा प्रकारे तयार केले जातात याची माहिती घेतली. तसेच पेपर मिल येथे भेट देऊन तेथील बनवल्या जाणाऱ्या उपयुक्त साधनांची माहिती घेतली. रविवारी सकाळी पांडवकालीन प्राचीन काळातील पाटेश्वर डोंगरावरील महादेव मंदिरातील शंभू महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेऊन पाटेश्वर येथील उत्कृष्ट स्थापत्य कलेचा नमुना असलेल्या लेणी, शिवलिंग आणि शिल्पांची पाहणी केली. त्यानंतर पाटेश्वर येथील रिद्धी सिद्धी गणेश मंदिर, कार्तिकेय मंदिराचे आणि श्री गोविंदानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. त्यावेळी पाटेश्वर डोंगर इतिहासपर विशेष अभ्यास करणारे प्राध्यापक तुषार बाहेकर यांच्याकडून पाटेश्वर परिसरातील सर्व लेणी, शिवलिंगे, शिल्पे तसेच श्री गोविंदानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या कार्याची माहिती घेण्यात आली. सोमवारी या शिबिरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे इतिहासाबद्दल व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यानंतर शिबिरात विशेष उपस्थित पश्चिम महाराष्ट्र प्रदेश मंत्री अथर्व कुलकर्णी यांचे अखिल भारतीय इतिहास विद्यार्थी परिषद व आजच्या शाळा कॉलेज मधील विद्यार्थी या विषयावर व्याख्यान आयोजित करून त्याबद्दल सखोल माहिती घेण्यात आली. भारतीय इतिहास व देव देश आणि धर्म आदी विषयांवर अभ्यास करणारे इतिहास अभ्यासक अजय बर्गे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. सोमवारी दुपारी करियर अर्थात आयुष्यक्रम या विषयावर सविस्तर मांडणी करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवणे यासाठी प्राध्यापक दयानंद घाटगे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. तीन दिवस झालेल्या या उत्कृष्ट शिबिराचा लाभ घेऊन सर्व विद्यार्थ्यांनी खूप आनंद व्यक्त करून आयोजकांचे तसेच मार्गदर्शन करणाऱ्या सर्व प्राध्यापक यांचे आभार मानले. शिबीर कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न करण्यासाठी उपस्थित सर्वांनी परिश्रम घेतले....!

 सदर शिबिरामध्ये अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाच्या कुमारी इंदिरा संजय जाधव, सयाजीराव हायस्कूलच्या स्वराली नलवडे, संस्कृती नलवडे, गुरुकुल स्कूलच्या शरयू निलेश नलावडे, मनस्वी जाधव, रेवा जाधव हिंदवी पब्लिक स्कूलच्या अनन्या घोरपडे, तसेच यशोदा व वाय सी कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता