नागरिकांच्या सोयीसाठी स्वखर्चाने केली दुरुस्ती
अलिबाग (रत्नाकर पाटील)
अलिबाग शहरातील प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची जाणीव करुन देण्यासाठी वटपोर्णिमेच्या निमित्ताने अलिबागमधील सत्यवानांनी खड्ड्यांमध्ये वडाचे झाड लावून वटपुजा केली. याबाबतचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. अखेर माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत स्वखर्चाने तात्काळ रस्ते दुरुस्तीला सुरुवात केली. त्यामुळे नागरिकांनी प्रशांत नाईक यांचे आभार मानले तर बांधकाम विभागाच्या गलथान कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली.
अलिबाग प्रवेशद्वाराजवळच पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे पर्यटकांसह स्थानिकांनाही नाहक त्रास सहन करावा लागत होता. याबाबत नागरिकांनी अनेकदा बांधकाम विभागाकडे तक्रारी केल्या. अखेर अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत या रस्त्याची दूरुस्ती स्वखर्चाने करण्यास बुधवारी (दि.11) सुरुवात केली. या खड्डेमय रस्त्यावर पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहेत. त्यामुळे पावसाळ्यात खड्ड्यातून जाण्याचा प्रश्न सुटणार आहे. शासनाच्या एक पाऊल पुढे जात प्रशांत नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत हा उपक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.
अलिबाग शहराचे प्रवेशद्वार असलेल्या चेंढरे बायपास, निलिमा हॉटेल, रेवदंडा बायपास रोड या परिसरात खड्डयाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसह नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. अलिबाग शहराच्या प्रवेशद्वारासमोरील रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. गेली तीन वर्षापासून खड्ड्यांचे साम्राज्य आहे. खड्डे वाचवितांना अनेकवेळा अपघात होत आहेत. रस्त्यावरून ये-जा करताना विद्यार्थी व पालकांना कसरत करावी लागत आहे. जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचेदेखील खड्डयांमुळे हाल होत आहेत. खडड्यांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. अलिबाग हे जिल्ह्याचे ठिकाण आहे. तसेच पर्यटकांसह नागरिकांची हजारोच्या संख्येने या ठिकाणी वर्दळ असते. शहराच्या प्रवेशद्वारासमोरच असलेल्या खड्डयांमुळे नागरिकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
ही बाब अलिबागचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिली. आठ दिवसांपूर्वी प्रशासनाला निवेदनही दिले. परंतु रस्ता दुरुस्तीबाबत प्रशासनाने कोणतीही भूमिका घेतली नाही. त्यामुळे अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वखर्चाने रस्त्याची दूरुस्ती करण्यासाठी पाऊल उचलले. बुधवारी (दि.11) सकाळी स्वतः त्यांनी कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून जेसीबीच्या मदतीने रस्त्याची समपातळी करून घेतली. त्यानंतर त्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविण्यात येणार आहे. प्रशांत नाईक यांनी पुढाकार घेत रस्त्याची दूरुस्ती करण्यास सूरुवात केल्याने त्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन करण्यात आले.
Social Plugin