Ticker

6/recent/ticker-posts

अलिबाग-वडखळ रस्त्यावर जीवघेणे खड्डे



खड्डे बुजवायचे कोणी? अधिकाऱ्यांची टोलवाटोलवी

अलिबाग(रत्नाकर पाटील

अलिबाग-वडखळ मार्गावर मोठ मोठे जीवघेणे खड्डे पडले असून, ते बुजवायचे कोणी? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे. या मार्गावर दररोज कुठे ना कुठे अपघात होत असताना, संबंधित विभागाला मात्र याचे काहीच सोयरसुतक नसल्याचे समजते. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता रस्ता आमच्या अखत्यारित नाही, एनएच-1 यांच्याकडे आहे. त्यामुळे रस्ता दुरुस्तीचे काम आमचे नाही, असे सांगून त्यांनी जबाबदारी झटकण्याचे काम केलेय. त्याचप्रमाणे अलिबाग ते रेवदंडा हा रस्ताही एमएसआरडीसीकडे वर्ग केला असून, त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी त्या विभागाची असल्याचे सांगितले. मग, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काम तरी काय? असा सवाल आता स्थानिक नागरिक विचारु लागले आहेत.

अलिबाग-वडखळ मार्गावर सुरुची हॉटेलजवळ, पिंपळभाट, गोंधळपाडा, गोकुळेश्वर, वाडगावफाटा, खंडाळा, कार्लेखिंड, तिनवीरा, पेझारी, पोयनाड, वडखळ आदि ठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. या मार्गावरुन रात्री-अपरात्री जाताना मोठे अपघात होत आहे. अनेकदा दुचाकी खड्ड्यात अडकून अपघात होत आहेत. चारचाकी वाहने खड्ड्यात जोरात आदळून अपघात होत असून, वाहने नादुरुस्त होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता डोंगरे यांना संपर्क साधला असता, हा रस्ता एनएच-1 या विभागाकडे वर्ग असल्यामुळे रस्त्याच्या दुरुस्तीचे काम त्या विभागाचे असल्याचे सांगत त्यांनी सांगितले. रस्ते अपघातात आज निष्पाप लोकांचे जीव जात असताना, वाहने नादुरुस्त होत असताना अधिकाऱ्यांना मात्र रस्त्याची मालकी आठवतेय, याबाबत सर्वसामान्य जनतेतून चीड आणि संताप व्यक्त होत आहे.

एनएच-1चे कार्यालय संपर्कहीन?

अलिबाग ते वडखळ रस्त्याची जबाबदारी एनएच-1 विभागाकडे असून, त्याचे कार्यालय पनवेल येथे आहे. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना या कार्यालयाचा किंवा येथील जबाबादार अधिकाऱ्याचा संपर्कच महिती नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे या विभागाशी संपर्क करणे शक्य झाले नाही. आज निष्पाप नागरिकांचा खड्ड्यांमुळे जीव जात असनाता याची जाणीव निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना नसणे, याबाबत संताप व्यक्त होत आहे.

… तर अपघाताची जबाबदारी 'एमएसआरडीसी'ची

अलिबाग, सहाण बायपासपासून रेवदंडापर्यंतचा रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे डोंगरे यांनी दिली. एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता म्हणून बिनी असल्याचेही ते म्हणाले. आज या रस्त्याची अवस्था फार बिकट आहे. जागोजागी रस्ता खचला आहे. अलिबाग-बेलकडे जवळच्या मोऱ्यांना संरक्षक कठडे नसल्याने जीवघेणा अपघात होऊ शकतो. याआधीसुद्धा निष्पाप नागरिक जीवास मुकले आहेत. त्यामुळे  डोंगरे यांच्या म्हणण्यानुसार जर एमएसआरडीसीकडे हा रस्ता वर्ग असेल, तर या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांची जबाबदारीसुद्धा त्यांची असेल.

बांधकाम विभागाकडे काय काम?

जर अलिबाग ते वडखळ मुख्य रहदारीचा रस्ता आपल्याकडे नाही, अलिबाग ते रेवदंडा रस्ताही आपल्याकडे नाही, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी सांगत आहेत. रस्ता दुरुस्ती करणाऱ्या विभागाचे संपर्कही आपल्याकडे नाही. रस्त्यांवर खड्डे पडले की सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संघटना पुढे येऊन खड्डे भरत असतील, तर सार्वजनिक विभाग काय काम करणार, की खड्डे भरताना बघत बसणार आणि निष्पाप लोकांचे जीव जात असतानाही बघ्याची भूमिका घेणार, असा परखड सवाल सर्वसामान्य जनता आणि वाहनचालक करीत आहेत.

चौलनाका दुचाकीसाठी धोकादायक

अलिबाग-रेवदंडा मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असणारा चौलनाका दुचाकींसाठी धोकादायक ठरत आहे. याआधी येथे मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येत दगडखडीचा भराव केला आहे. परंतु, आज याठिकाणी दुचाकी स्लीप होणे, दुचाकीची चाके जागेवरच फिरणे असे प्रकार घडत असून, अनेक दुचाकीस्वार पडून त्यांना दुखापती झाल्या आहेत. परंतु, संबंधित विभागाचे अधिकारी चारचाकीतून फिरत असल्याने त्यांना याचे गांभीर्य नाही. अधिकाऱ्यांनी येथून दुचाकीने प्रवास करावा, मग त्यांना समजेल, प्रवास कसा करतोय आम्ही, असा संताप स्थानिकांनी व्यक्त केला आहे.

अलिबाग ते वडखळ रस्ता एनएच-1 विभागाच्या अखत्यारित असून, त्याची डागडुजी, दुरुस्ती करण्याचे काम त्यांचेच आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे रस्त्याची जबाबदारी नाही. त्याचप्रमाणे अलिबाग ते रेवदंडा, पाल्हे बायपाससहीत हा रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला असून, या रस्त्याच्या दुरुस्ती या विभागाने करणे अपेक्षित आहे.

उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग