Ticker

6/recent/ticker-posts

दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांचा शिवसेना प्रवेश निश्चित



 21 जून रोजी अलिबाग येथे करणार पक्षप्रवेश

 अलिबाग (रत्नाकर पाटील)

 भाजपचे माजी जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भोईर उर्फ छोटम शेठ यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. शनिवारी 21 जून रोजी मंत्री उदय सामंत, मंत्री भरत गोगावले आणि अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ते शिवसेनेत प्रवेश करणार आहे.

      दिलीप भोईर यांनी शेकापक्षाकडून जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती पद भूषवले आहे. तीन वर्षापूर्वी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्यावर भाजपने रायगड जिल्हा उपाध्यक्ष पदाची तसेच अलिबाग निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी सोपवली होती. 2024 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अलिबाग मतदारसंघातून निवडणूक लढवली.

         शिवसेनेकडून अलिबागचे आमदार महेंद्र दळवी, शेकापकडून चित्रलेखा पाटील आणि अपक्ष म्हणून दिलीप भोईर अशी तिरंगी लढत झाली. या निवडणुकीत दिलीप भोईर यांना लक्षवेधी 33 हजार 500 मतं मिळाली. तिसऱ्या क्रमांकाची मते त्यांनी घेतली होती.मात्र पक्षाचा आदेश न पाळल्यामुळे दिलीप भोईर यांना भाजपने पाच वर्षासाठी निलंबित केले.   विधानसभा निवडणूक संपल्यापासून दिलीप भोईर हे भाजपचे दरवाजे पुन्हा एकदा खट खटवायला लागले होते. मात्र त्यांना यश आले नाही. पक्षाची शिस्त न पाळणाऱ्या पदाधिकाऱ्यांबाबत निर्णय भाजपसाठी राज्य पातळीवरचा आहे. जेव्हा पक्ष पातळीवर निर्णय होईल तेव्हा तो सर्वांसाठी होईल,असे भाजपचे नेत्यांचे म्हणणे आहे   शेवटी दिलीप भोईर यांना शिवसेना शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. 21 जून रोजी अलिबाग मध्ये त्यांचा हा पक्षप्रवेशाचा सोहळा होणार आहे. शिवसेना नेते उदय सामंत, मंत्री भरत गोगावले आणि आमदार महेंद्र दळवी यांच्या प्रमुख उपस्थिती यावेळी राहणार आहे.

         विशेष म्हणजे आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात दिलीप भोईर यांनी विधानसभा निवडणूक लढवली होती. तेच भोईर आता आमदार महेंद्र दळवी यांच्यात पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे हा एक चर्चेचा विषय ठरत आहे.

दिलीप भोईर यांचा शिवसेना प्रवेश निश्चित झाला आहे. या मतदार संघात आम्‍ही दोघे एकत्र आलो तर विकासाला अधिक चालना मिळेल या हेतूने आम्‍ही हा निर्णय घेतला आहे. मागील सर्व विसरून आम्‍ही एकत्र येत आहोत. त्‍यांनी भाजपमधून बाहेर पडून अपक्ष निवडणूक लढवली होती. त्‍यामुळे त्‍यांच्‍या शिवसेना प्रवेशावर भाजपचा आक्षेप असेल असं वाटत नाही. – महेंद्र दळवी, आमदार


विधानसभा निवडणूकीत अपक्ष लढूनदेखील मला 33 हजार मतं मिळाली. निवडणूकीनंतर मी भाजपच्‍या वरिष्‍ठ पातळीपासून जिल्‍ह्यातील नेत्‍यांशी संपर्क साधला परंतु मला त्‍यांच्‍याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपल्या भागातील विकास कामे व्‍हावीत या प्रमाणिक हेतूने मी शिवसेना प्रवेश करीत आहे. – दिलीप भोईर