Ticker

6/recent/ticker-posts

रायगड जिल्ह्यातील ३८९ इमारती धोकादायक, प्रशासनानं घेतला मोठा निर्णय…



 रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे आदेश

अलिबाग-(रत्नाकर पाटील) 

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्ह्यातील प्रमुख शहरांमध्ये  सर्वेक्षण करण्यात आलेआहे. यात ३८९ इमारती धोकादायक परीस्थितीत असल्याचे निदर्शनास आले आहे. या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत होण्याचे निर्देश प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि नगरपंचायतींना धोकादायक इमारती आणि धरणांचे सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानंतर पनवेल महानगर पालिका आणि सर्व नगरपालिकांनी आपले अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केले. या शहरांमध्ये प्राथमिक पहाणीत ३८९ इमारती धोकादायक असल्याचे दिसून आले. यात २२ शासकीय इमारती तर उर्वरीत खाजगी इमारतींचा समावेश आहे. ३६७ खाजगी इमारतींचा समावेश आहे. यात पनवेल येथे सर्वाधिक ८० ,कर्जत येथे ७, उरण ५१, खोपोली ७०, पेण ३८, महाड २७, श्रीवर्धन १५, अलिबाग ९, रोहा ११, मुरुड २२, माथेरान २, खालापूर ४, म्हसळा ८, माणगाव २४, पोलादपूर १३, पाली ८, धोकादायक इमारतींचा समावेश आहे.

या सर्व इमारतींमधील रहिवाश्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत अधिनियम १९६५ च्या कलम १९५ अन्वये नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. यानुसार इमारतींमधील रहिवाश्यांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरीत होण्यास सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर खालापूर, तळा, म्हसळा, माणगाव, सुधागड आणि पोलादपूर येथील नगरपंचायतीना धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करून, तेथील रहिवाश्यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.