Ticker

6/recent/ticker-posts

अलिबाग मध्ये शिवराज्याभिषेक पूजा सोहळा संपन्न.



अलिबाग (रत्नाकर पाटील) 

ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी १६७४ या दिवशी विधीपूर्वक राज्याभिषेक होऊन शिवराय छत्रपती झाले. रायगडावर झालेला न भूतो न भविष्यति असा ‘शिवराज्याभिषेक सोहळा’ महाराष्ट्राच्याच नव्हे तर अखंड हिंदुस्थानातील इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरला गेला. दरवर्षीप्रमाणे यंदाही तारखेनुसार ६ जूनला शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जात आहे. यंदा राज्याभिषेकाचे ३५१ वे वर्ष पूर्ण होत आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिव छत्रपती महाराजांच्या ऐतिहासिक राज्याभिषेक दिनानिमित्त शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने अलिबाग जोगळेकर नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेक पूजन सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात पार पडला.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवराज्याभिषेक समितीच्या वतीने करण्यात आले होते. समितीचे संस्थापक आकाश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. पूजन विधीमध्ये पंचामृत अभिषेक, दुग्धाभिषेक, आणि शिवराज्याभिषेकाची  पारंपारिक पद्धतीने पूजा संपन्न झाली. यावेळी मराठी पोशाख परिधान केलेल्या नागरिकांनी उपस्थितांना इतिहासाची आठवण करून दिली.

कार्यक्रमात स्थानिक नागरिक, विद्यार्थी, इतिहासप्रेमी, आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संपूर्ण परिसर ‘राजा शिवछत्रपती की जय!’ च्या घोषणांनी दुमदुमून गेला. समितीचे संस्थापकांनी महाराष्ट्राचे आराध्यदैवत मानले जाणाऱ्या शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकदिनी आपणही महाराजांचे विचार स्मरणात व आचरणात आणून त्यांना मानाचा मुजरा करू शकता 

असे अभिवादन केले. या वेळी मंगलमूर्ती व कुलाबा ढोल पथक यांनी सुंदर वाद्य वाजन केले.तर मलखांब पटू यांनी लाठीकाठीचे मर्दानी खेळ सादर केले.