अलिबाग (रत्नाकर पाटील)
राज्य व केंद्र शासनामार्फत विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत आहॆ. या सर्व योजनांचा तत्परतेने लाभ देण्यासाठी तसेच जनतेचे प्रश्न गांभीर्याने सोडविण्यासाठी सर्व यंत्रणानी अलर्ट मोडवर काम करावे असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण, पाणीपुरवठा व स्वच्छता, ऊर्जा, महिला व बालविकास, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत श्रीमती बोर्डीकर यांनी आज सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, ऊर्जा, महिला व बालविकास तसेच सार्वजनिक बांधकाम विभागांचा सविस्तर आढावा घेतला. बैठकीस खा. धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपजिल्हाधिकारी डॉ रविंद्र शेळके, माजी आमदार पंडित पाटील यांसह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत रायगड जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे नियोजन व अंमलबजावणी तसेचग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सुरू असलेल्या योजनांचा आढावा घेण्यात आला. यावेळी पाणी पुरवठा योजनेची प्रगती आणि उर्वरित गावांमध्ये जलवाहिन्या पोहोचवण्याच्या उपाययोजनांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. जिल्ह्याच्या पाणी प्रश्न, जलजीवन आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आदी विषयावर मंत्रालयात विशेष आढावा बैठक घेण्यात येईल असे राज्यमंत्री श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी जाहीर केले. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आरोग्य विभागातील रिक्त पदभरती प्रक्रिया तातडीने करावी. आरोग्याच्या सुविधा आणि योजना १०० टक्के राबविल्या जातील याकडेही लक्ष द्यावे, असेही त्यांनी सांगितले. वीज वितरण विषयक तक्रारींचे तात्काळ निराकरण करावे. अखंडित वीजपुरवठा सुरु ठेवण्यासाठी सर्वांनी नेहमी दक्ष रहावे. भूमिगत वायरिंगचे काम पूर्ण झाले असल्यास ओव्हरहेड वायरिंग हटविण्यात यावेत. अनेक ठिकाणी ट्रान्सफॉर्मर वारंवार बदलावे लागतात सेवा सप्ताह अंतर्गत जी धोकादायक क्षेत्र निश्चित केली आहेत त्या ठिकाणी तातडीच्या उपाययोजना कारव्यात अशा सूचना श्रीमती बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या.
प्रत्येक विभागाच्या अधिकाऱ्याने जनतेच्या प्रश्नाची गांभीर्याने व तत्परतेने दखल घेऊन ते प्रश्न मार्गी लावावेत असेही त्यांनी सांगितले. प्रारंभी संबंधित विभागांच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली. जिल्ह्याच्या विकासासाठी प्रशासन दक्ष असून विविध योजनांची अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी सांगितले.
Social Plugin