नाशिक , प्रतिनिधि , अमन शेख ,
यंदा पावसाने सर्वांचीच कसोटी पाहायची ठरवलेले दिसते. गेल्या दोन-अडीच महिन्यांपासून नाशिककरांना पर्जन्यराजाने चिंब भिजवले आहे. संपूर्ण मे महिनाभर अवकाळी पावसाने हजेरी लावली तेव्हा उन्हाच्या काहिलीने त्रस्त झालेल्या नागरिकांना तो पाऊस हवाहवासा वाटला. नंतर अवकाळीचा पाऊस मोसमी कधी झाला ते कळलेही नाही. हा अवकाळी की मोसमी हा वादही तज्ज्ञांमध्ये रंगला. पावसाने मात्र त्याकडे दुर्लक्ष करून एकेका ऋतूचे सोहळे मनसोक्त साजरे केले. आता पुनर्वसू नक्षत्र सुरू आहे, तेदेखील दणकेबाज. एरवी या काळातील पाऊस शेतकर्यांसह आम जनतेलाही दिलासा देणारा असतो. साहजिकच त्याचे स्वागत होते.
परंतु गेले काही दिवस धो धो बरसणार्या पावसाने सूर्यनारायणालाही कितीतरी दिवस रजेवर पाठवून दिल्याने केवळ शहरीच नव्हे तर ग्रामीण भागातील शेतकर्यांसह सामान्य ग्रामस्थही आता कंटाळले आहेत. पावसाने थोडीतरी उघडीप द्यावी, अशी याचना शेतकरी करीत आहेत. शहरातील नागरिकांची तर वेगळीच अडचण. त्यांना दररोज एकदा तरी भिजावेच लागते आहे. त्यातून येणार्या प्रासंगिक आजारपणामुळे ते वैतागलेले आहेत. सततच्या पावसाने दररोज धुतले जाणारे कपडे वाळत नाही म्हणून समस्त गृहिणीही करवादत आहेत. सव्वा महिन्यातच गोदावरीने पाचव्यांदा तट ओलांडल्याचा विक्रम केला. या पुरांमुळे नदीकाठच्या व्यावसायिकांचे धंदे बसले. तेदेखील व्यथित आहेत.
पावसाच्या रिपरीपीने भाजीपाल्याचा टिकाऊपणा गेल्याने शेतकरी तर वैतागला आहेच, पण किरकोळीत विक्री करणारे विक्रेतेही घेणारे येत नसल्याने नाराज आहेत. एकूणच हवाहवासा वाटणारा पाऊस सध्या तरी नकोनकोसा झाला आहे. याचे आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे जवळपास सर्वच रस्त्यांनी या पावसापुढे दम तोडला आहे. अगदी सिमेंट क्राँक्रिटच्या रस्त्यांनीही राम म्हणायला सुरुवात केली आहे. वरून धरलेली संततधार, पाण्याने वाहणारे रस्ते, याच पाण्यात गुडूप झालेले खड्डे अन् ते न दिसल्याने त्यात पडून झालेली गोची असा सारा छळवाद सुरू आहे. किती म्हणून पाऊस पडावा, यालाही अलीकडे जणूकाही धरबंधच राहिलेला नाही. अवघ्या सव्वा महिन्यात सव्वाशे टक्के पाऊस पडला. जवळपास सर्वच धरणे निम्म्याहून अधिक भरली. अशा सर्वच धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने ठिकठिकाणी झालेली पूरस्थिती यातून निर्माण होणार्या समस्या हा आणखी एक नवाच अध्याय बनला आहे.
एकतर पाऊस अन् डांबर यांचे हाडवैर सर्वश्रुत आहे. त्यातच रस्ते, ठेकेदार अन् अधिकारी यांची अभद्र युतीदेखील सर्वव्यापी! दरवर्षी साधारण एकट्या नाशिक महापालिकेत चारशे ते पाचशे कोटींचा रस्ते कामांवर वर्षाव होतो. त्यातील किती रस्त्यात जातात अन् किती मधल्या मध्ये जिरतात हा भाग संशोधनाचा ठरावा. दरवर्षी पावसाळ्यात रस्त्यांच्या नावाने बोटे मोडतच नागरिकांचे दिवस जातात. पुढारी आंदोलने करतात, चौकशांचे आदेश निघतात. नंतर पुन्हा तेच रस्ते नव्याने केले जातात. त्यावर पुन्हा कोट्यवधींचे डांबर टाकले जाते. पाऊस आपला निसर्ग नियमानुसार येतच असतो अन् हे चक्र सदैव चालूच असते. गेल्या महिनाभरातही असेच फक्त सतरा कोटी रस्ते दुरुस्ती किंवा खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने खर्ची टाकले. आजची अवस्था काय, तर शहरातील एकही रस्ता बिनखड्ड्याचा नाही.
नाशिककरांना या भावात चंद्राची सफर घडवण्याची महापालिकेच्या अधिकार्यांची ही अद्भूत युक्ती लाजवाब आहे. रस्त्यावरील खड्ड्यांची तक्रार आली रे आली की अधिकारी जणू त्याची वाटच पाहत असतात, अशा तत्परतेने ठेकेदाराला ते बुजवण्याचे आदेश देतात. ही अशी थोडीच कामे असतात की ज्याचे टेंडर काढावे लागत नाहीत. सार्वजनिक सेवेची तत्परता किंवा गरजेपोटी या अशा कामांना मंजुरी व लागलीच निधी दिला जात असल्याने त्याकडे कल अधिक असणे स्वाभाविक असते. गेल्या महिनाभरात पाऊस चालूच असल्याने रस्त्यांची अवस्था वाईट होणे समजू शकते. परंतु ते दुरूस्त करतानाही केली जाणारी टंगळमंगळ, त्यातूनही पैसे काढण्याची क्लृप्ती हे सगळेच भीषण आहे.
एक साला मच्छर आदमी को… बना देता है’ हा नाना पाटेकर यांचा संवाद फिल्मी असला तरी त्याच भाषेत बोलायचे झाल्यास ‘एक साला खड्डा कितनों को लखपती बना देता है’ असे म्हणता येते. हे आता नेहमीचेच झाल्याने त्याला काही पर्याय वा उत्तरही दिसत नाही. लोक तक्रारी करतात, पण त्याचा पाठपुरावा करत नाहीत. त्यांना तेवढा वेळही नाही. दररोजचे जगणेच एवढे गुंतागुंतीचे बनून गेले आहे की सामान्यांना अशा कोणत्याच भानगडीत पडावेसे वाटत नाही. ते गपगुमान या सार्या अव्यवस्था सहन करत जगत असतात. त्यांच्या भल्याचे ठेके ज्यांनी घेतलेले असतात ते नगरपिते मात्र जनहिताचा आव आणून होणार्या कामात किती वाटा मिळेल या आकडेमोडीत गुंग राहतात. वर्षानुवर्षे हे असेच चालू आहे.
आज पावसाचे निमित्त आहे. उद्या दुसर्या काही कारणाने रस्ते खराब झालेले असतात. ते दुरूस्त करावेच लागतात. त्यात सर्वाधिक मलई असल्याने लोकांच्या तक्रारीलाही त्याकाळात महत्त्व प्राप्त होते. खड्डा दुरूस्त होतो, लोक खूश होतात. नगरपिते व अधिकारी मनोमन हसतात आणि हे असेच चालू राहावे यासाठी देवाजवळ प्रार्थनाही करतात. ये रे ये रे पावसा तुला देतो पैसा हे बडबड गीत असले तरी त्यातील मथितार्थ आताशा कळू लागला आहे. पावसालाही या पैशाची चटक तर लागली नाही ना? कारण हा पैसा कधीच खोटा होत नाही तरी पाऊस मात्र मोठाच येत असतो…
Social Plugin