साहेबराव अंभोरे @ग्रामीण प्रतिनिधी
मेहकर - तालुक्यातील आंध्रुड येथील ' स्वरसम्राट ' गायन संचाचे शाहीर भिमराव अंभोरे व पांगरखेड येथील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेतील पदवीधर शिक्षक तथा गायक साहेबराव अंभोरे यांना राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार 2025 राजर्षी शाहू स्मारक भवन,कोल्हापूर येथे एका समारंभात २९ जून रविवारला मान्यवरांच्या हस्ते मानाचा फेटा, स्मृतिचिन्ह, मानपत्र व ग्रंथ भेट देऊन सपत्नीक सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्रातून आलेल्या अनेक प्रस्तावातून निवड समितीने विविध निकषांच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील ६१ मान्यवरांची निवड सदर पुरस्कारासाठी केली होती.मानवतावादी सांस्कृतिक चळवळ दीक्षा चॅरिटेबल ट्रस्ट या नावाजलेल्या संस्थेच्या वतीने राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार-२०२५ या मानाच्या व सन्मानाच्या पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ' राजर्षी शाहू महाराज यांना समजून घेताना... या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते भरत रसाळे यांचे व्याख्यान झाले.त्यानंतर डॉ. प्रशांतकुमार कांबळे,प्राचार्य, राजर्षी शाहू कला व वाणिज्य महाविद्यालय, रूकडी यांना मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार-२०२५ देऊन गौरविण्यात आले.यावेळी निर्मिती प्रकाशन, प्रकाशित आणि भारतीय ज्येष्ठ साहित्यिक तथा संविधानाचे अभ्यासक प्रा. डॉ.श्रीपाद देसाई लिखित भारतीय संविधान का वाचावे? का वाचवावे? या ग्रंथाचे प्रकाशन ही करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिल म्हमाने (प्रकाशक व दिग्दर्शक) हे होते .प्रमुख वक्ते मा.भरत रसाळे तर प्रमुख पाहुणे प्रा.किसनराव कुराडे,डॉ.सोमनाथ कदम,मा.भरत लाटकर हे होते. कार्यक्रमाचे निवेदक मा.अर्हत मिणचेकर होते तर कार्यक्रमाचे निमंत्रक मा.विश्वासराव तरटे , प्रा.डॉ.शोभा चाळके,मा.अंतिमा कोल्हापूरकर ह्या होत्या. व्याख्यान, जीवन गौरव पुरस्कार आणि राजर्षी शाहू राष्ट्रीय सन्मान पुरस्कार असे या कार्यक्रमाचे तिहेरी स्वरूप होते.भिमराव अंभोरे व साहेबराव अंभोरे हे दोघेही सख्खे भाऊ आहेत हे विशेष.
शिक्षकी पेशा सांभाळून गत ३० वर्षांपासून गायन कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खेडेपाडे, वाडी वस्ती,तांडे,दऱ्याखोऱ्यातील आदिवासी गावे यामध्ये शिव फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेच्या माध्यमातून करत असलेले समाज प्रबोधनाचे कार्य तसेच शिक्षण क्षेत्रातील गुणवत्तापूर्ण योगदान व समाजात सकारात्मक परिवर्तन घडवणाऱ्या शैक्षणिक व सामाजिक कार्याबद्दल साहेबराव अंभोरे यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
१९८० सालापासून म्हणजे जवळपास ४५ वर्षांपासून वयाच्या १४ व्या वर्षापासून गायन, कलापथक या कलेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात खेड्यापाड्यात, वाडी वस्ती, तांड्यावर, दऱ्याखोऱ्यातील आदिवासी गावात जाऊन 'स्वरसम्राट'गायन संच, मेहकर या प्रबोधनात्मक संगीत ग्रूप च्या माध्यमातून शिव फुले शाहू आंबेडकर या महापुरुषांचे विचार तसेच विविध सामाजिक प्रबोधनाचे विषय यावर शाहीर भिमराव अंभोरे समाजात सकारात्मक परिवर्तन करण्याचे कार्य करत आहेत. त्यांच्या या सामाजिक कार्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे.
Social Plugin