Ticker

6/recent/ticker-posts

खासगी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांवर गुन्हा



नाशिक, प्रतिनिधि ,अमन शेख ,

बनावट दाखल्याच्या आधारे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नोकरी मिळविणारा कर्मचारी, त्याला हजर करून घेणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यासह निवृत्त महिला कर्मचाऱ्यावर फसवणुकीसह अन्स बीएनएस कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. सिव्हिल हॉस्पिटलचे मुख्य प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील, बोगस दाखल्याच्या आधारे नोकरी मिळविणारा मिलिंद सतीश पवार आणि निवृत्त सफाई कर्मचारी जिजाबाई मुरलीधर गायकवाड अशी संशयितांची नावे आहेत. अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नीलेश सोपानराव पाटील यांनी फिर्याद दिली आहे.

संशयित गायकवाड यांनी ‘झाड गल्ली १२’ जातीचा बोगस दाखला सादर केल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. संबंधित प्रकरणाबाबत उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडूनही अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे आरोग्य उपसंचालक डॉ. कपिल आहेर यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चारुदत्त शिंदे यांना दिले होते. बनावट जातीच्या दाखल्याच्या आधारे नोकरी देऊन सरकारची फसवणूक झाल्याचा अहवाल समितीने सादर केल्यामुळे पाटील यांनी फिर्याद नोंदविली आहे. संशयित गायकवाड सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सफाई कामगार होती. ३१ मे २०१० रोजी ती निवृत्त झाली.

परिचयातील संशयित मिलिंद पवार याला लाडपागे समितीच्या शिफारशीच्या आधारे सफाई कामगार म्हणून नोकरीवर घ्यावे असा अर्ज तिने १२ फेब्रुवारी २०१८ रोजी सिव्हिल प्रशासनाकडे केला. प्राप्त अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे तपासून तत्कालीन व विद्यमान प्रशासकीय अधिकारी व्ही. डी. पाटील यांनी पवार याला नोकरी देण्याचा प्रस्ताव तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सकांपुढे ठेवला. त्यांच्या आदेशान्वये २९ मे २०१८ रोजी पवार सफाई कर्मचारी म्हणून रूजू झाला. सेवा पुस्तिकेत गोंधळी जातीची नोंद असतानाही गायकवाड हिने पवार याला नोकरी मिळवून देण्याकरीता झाडगल्ली १२ जातीचा दाखला प्रस्तावासोबत सादर केला होता.

मिलिंद पवार यांना नियुक्ती देतांना प्रशासकीय कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनी शासनाची दिशाभूल केली. व्ही. डी. पाटील यांनी २०१८ पासून त्यांच्या जात प्रमाणपत्राची खातरजमा केली नाही व गायकवाड यांची जात गोंधळी असल्याचे माहीत असूनही पाटील यांनी बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे पवार याला नोकरी दिल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले आहे.

चौकशी समितीने अहवाल दिला आहे. त्याआधारे सिव्हिल हॉस्पिटलच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांसह तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. खातेनिहाय चौकशी करण्याचा प्रस्ताव आरोग्य संचालकांकडे पाठविणार आहोत.-डॉ. चारूदत्त शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक