छायाचित्र - पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त महाआरती करताना मठाधिपती सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव व विश्वस्त.

बुध  दि . [प्रकाश राजेघाटगे ] 

पुसेगावयेथील श्री सेवागिरी महाराज यांचा प्रकट दिन सोहळा शनिवारी विविध धार्मिक कार्यक्रमांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा झाला. सन १९०५ मध्ये धनत्रयोदशी दिवशी पुसेगावमध्ये श्री सेवागिरी महाराजांचे आगमन झाले होते, त्यामुळे यावर्षीपासून महाराजांचा प्रकट दिन सोहळा साजरा करण्याचा निर्धार पुसेगावकरांनी केला होता. तिथीनुसार शनिवारी पहाटे पाच वाजता 'श्रीं'च्या समाधीस महाभिषेक करण्यात आला. मठाधिपती श्रीमहंत सुंदरगिरी महाराज, अध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, विश्वस्त रणधीर जाधव, संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने ,ग्रामस्थ व भाविकांच्या उपस्थितीत महाराजांच्या पादुकांना येरळा नदीत स्नान घालण्यात आले.

सकाळी सात ते नऊ लघुरुद्र व होमहवन, त्यानंतर हभप बापूसाहेब महाराज देहूकर यांचे कीर्तन आणि दुपारी १२ वाजता 'श्रीं'च्या समाधीस व प्रतिमेस पुष्पवृष्टी करण्यात आली. दुपारी बारा वाजता नित्य माध्यान्ह आरती व त्यानंतर महाप्रसाद वाटप करण्यात आला.