(प्रतिनिधी) वैभव सोळंके,
माजलगाव
सादोळा (ता. माजलगाव): ऊस दरवाढीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला सादोळा ग्रामपंचायतीच्या वतीने उपसरपंच राधाबाई कालिदास शिंदे यांनी अधिकृत पाठिंबा दर्शविला आहे. या संदर्भातील निवेदन त्यांनी उपविभागीय अधिकारी, माजलगाव यांच्या कार्यालयात सादर केले.
निवेदनात शिंदे म्हणतात, “साखर कारखानदारांनी जाहीर केलेला 2,443 रुपये प्रति टन दर हा उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपुरा आहे. खत, बियाणे, मजुरी, डिझेल, वाहतूक आदी सर्व बाबींमध्ये मोठी वाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना किमान 4,000 रुपये दर मिळणे अत्यावश्यक आहे.”
त्या पुढे नमूद करतात की, “दराचा योग्य तोडगा निघेपर्यंत शेतकऱ्यांनी ऊस तोड बंद व वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप न केल्यास परिस्थिती गंभीर स्वरूप धारण करू शकते.”
उपसरपंच शिंदे यांनी स्पष्ट इशाराही दिला की, “ऊस दराबाबत ठोस निर्णय न झाल्यास सादोळा गावातील सर्व शेतकरी उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन उभारण्यास बाध्य होतील.”
ग्रामपंचायत सादोळ्याच्या या अधिकृत पाठिंब्यामुळे ऊस दरवाढीच्या आंदोलनाला स्थानिक पातळीवर मोठे बळ मिळाले आहे.





Social Plugin