बुध दि . [प्रकाश राजेघाटगे ]
दरवर्षी मोठ्या उत्साहात पार पडणाऱ्या श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेची तयारी जलदगतीने सुरू असून यात्रेतील मुख्य आकर्षण ठरणाऱ्या प्रसाद बुंदी करण्याच्या कार्याचा प्रारंभ मंगलमय वातावरणात झाला. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टतर्फे यात्रेकरूंसाठी दिला जाणारा हा प्रसाद दरवर्षी लाखो भाविकांच्या श्रध्देचा केंद्रबिंदू ठरतो.
यावर्षीच्या बुंदी प्रसाद करण्याचा प्रारंभ मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष वाघ, डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत माजी पदाधिकारी, तसेच गावातील विविध मान्यवर उपस्थित होते. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना अखंड प्रसाद उपलब्ध व्हावा, तसेच प्रसादाची गुणवत्ता आणि शुद्धता अबाधित रहावी यासाठी संपूर्ण प्रक्रिया अत्यंत नियोजनबध्द रितीने केल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.
प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षीदेखील श्री सेवागिरी महाराजांच्या दर्शनासाठी पुसेगाव तीर्थक्षेत्रात लाखो भाविक येत असतात. भक्तांच्या श्रध्दा,उत्साह आणि आध्यात्मिक वातावरण, यामुळे संपूर्ण परिसरात आनंद आणि भक्तिभावाचे वातावरण निर्माण होते. यात्रेच्या काळात चोख व्यवस्था ठेवण्यासाठी देवस्थान ट्रस्ट, ग्रामपंचायत, विविध संस्था तसेच स्वयंसेवकांचे मोठे योगदान असते. बुंदी करण्याच्या शुभारंभावेळी उपस्थित मान्यवरांनी देवस्थान ट्रस्टच्या उपक्रमाचे कौतुक करताना, यात्रेदरम्यान भाविकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्वच यंत्रणा सज्ज असल्याचे सांगितले. प्रसादाच्या कार्याची पाहणी करताना श्री सुंदरगिरी महाराजांनी भक्तीभाव, सेवा आणि एकजूट यांचे महत्त्व अधोरेखित केले.
याप्रसंगी गावातील नागरिक, महिला मंडळे, कार्यकर्ते आणि स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यात्रेचा प्रारंभ समीप आला असून प्रसाद वितरणासह विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने यात्रेस उपस्थित राहून श्री सेवागिरी महाराजांच्या कृपेचा लाभघ्यावा, असे आवाहन श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे चेअरमन संतोष वाघ व सर्व विश्वस्तांच्याकडून करण्यात आले. छायाचित्र - पुसेगाव येथे बुंदी प्रसादाचा शुभारंभ करताना श्री सुंदरगिरी महाराज, डॉ. सुरेश जाधव व इतर मान्यवर.





Social Plugin