निघोजे (ता. खेड) – दिनकर बोरकर/प्रतिनिधी:

निघोजे येथील महिंद्रा गेट परिसरात धावत्या  PMPML च्या इलेक्ट्रिक बसला  सकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने चालकाच्या तत्परतेमुळे बसमधील प्रवासी थोडक्यात बचावले असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, बस निघोजे परिसरातून जात असताना मागील भागातून धूर निघताना दिसला. काही क्षणांतच धुराचे रूपांतर ज्वाळांत झाले आणि आगीने भीषण रूप धारण केले. आग मुख्यतः बसच्या मागील बाजूस पसरली.धूर दिसताच चालकाने प्रसंगावधान राखून बस रस्त्याच्या कडेला उभी केली आणि दरवाजे उघडून सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेनंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. प्राथमिक अंदाजानुसार इलेक्ट्रिकल बिघाड किंवा बॅटरीतून शॉर्ट सर्किट हे आगीचे कारण असावे, मात्र अधिकृत तपासानंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे.PMPML प्रशासनाकडून घटनेची चौकशी सुरू असून संबंधित बसची तांत्रिक तपासणी केली जाणार असल्याचे समजते.घटनेमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र सर्व प्रवासी सुरक्षित असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे.