“जनतेच्या दारी जे येतात कामासाठी,त्यांच्यावरच विश्वास वाढतो हक्कासाठी…फक्त आश्वासन नाही तर कृतीतून साथ दिली,म्हणूनच जनतेने आपल्या नगरसेवकांवर अभिमानाने मोहोर उमटवली…”
नांदगाव खंडेश्वर | प्रतिनिधी गौरव ब्राम्हणवाडे
प्रभाग क्रमांक २ व ३ मधील नागरिकांच्या अतिक्रमण नियमितीकरणासाठी विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले. राष्ट्रवादी स्वीकृत नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे, राष्ट्रवादी नगरसेविका छकुली राहुल गेडाम व प्रहार पक्षाचे नगरसेवक वैभव कोंडवते यांच्या संयुक्त पुढाकाराने हा कॅम्प दि. २७ मे २०२६ रोजी पार पडला.
या कॅम्पमध्ये प्रभागातील अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अतिक्रमण नियमितीकरणासाठी आवश्यक अर्ज स्वीकारणे, कागदपत्रांची पूर्तता करून घेणे तसेच शासकीय प्रक्रियेबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. नागरिकांना कार्यालयाचे वारंवार हेलपाटे मारावे लागू नयेत म्हणून ही सुविधा थेट प्रभागात उपलब्ध करून देण्यात आली.
कॅम्पदरम्यान नगरसेवकांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या व संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. तसेच प्रभागातील अनेक नागरिकांच्या घरी जाऊन अतिक्रमण नियमितीकरणाबाबत माहिती देण्यात आली. त्यामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून लोकांनी नगरसेवकांचे आभार व्यक्त केले.
यावेळी बोलताना स्वीकृत नगरसेवक अविनाश ब्राह्मणवाडे म्हणाले, “प्रभागातील नागरिकांची वर्षानुवर्षांची समस्या सोडवण्यासाठी हा कॅम्प महत्त्वाचा आहे. शासनाच्या नियमांनुसार पात्र अतिक्रमणे नियमित करून नागरिकांना हक्काचे घर मिळवून देणे हा आमचा उद्देश आहे.”
नगरसेविका छकुली राहुल गेडाम व नगरसेवक वैभव कोंडवते यांनी सांगितले की, “नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाची सेवा थेट त्यांच्या दारी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यापुढेही नागरिकांच्या हितासाठी असे उपक्रम राबवले जातील.”
या उपक्रमामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींविषयी विश्वास व अभिमानाची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले।





Social Plugin