मन्सूर शहा धोत्रा. भंनगोजी चिखली.:---
प्राप्त माहितीनुसार---आता आमची आई परत कधी येणार...? हा प्रश्न विचारत चार निष्पाप लेकरांच्या डोळ्यातील अश्रू थांबण्याचे नाव घेत नाहीत. एका आईच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब उद्धस्त झाले असून चिखली तालुक्यात घडलेल्या या हृदयद्रावक घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पैशांच्या वादातून सतत होत असलेल्या मानसिक छळ आणि धमक्यांना कंटाळून एका विवाहित महिलेने आत्महत्या के ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मृत महिलेचे नाव रुबीना बी. अकिल शाह असे असून, या प्रकरणी तिचे वडील मुक्तार शाह अकबर शाह (वय ५४, रा. मेरा खुर्द) यांनी चिखली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, सुलताना बी. सलीम शेख हिने दोन वर्षांपूर्वी शगुप्ता फकीरा शेख
हिला ३० हजार रुपये दिले होते. या व्यवहारात रुबीना बी. ही केवळ मध्यस्थ होती. मात्र संबंधित रक्कम परत न मिळाल्याने सुलताना बी. हिने रुबीना बी. लाच जबाबदार धरत वारंवार मानसिक त्रास देणे सुरू केले.
तू मध्यस्थी केलीस, त्यामुळे पैसे तूच परत कर. नाहीतर तुला आणि तुझ्या मुलांना घराबाहेर काढीन, घराला कुलूप लावीन आणि जीवे मारून टाकीन, अशा स्वरूपाच्या धमक्या दिल्या जात असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, सुलताना बी. वारंवार घरासमोर येऊन वाद घालत होती. या सततच्या मानसिक छळामुळे रुबीना बी. पूर्णपणे खचून गेली होती. अनेकदा समजावून सांगूनही त्रास थांबला नाही.
६ मे रोजी सायंकाळीही आरोपी महिलेने घरासमोर येऊन वाद घालत अपमानित
करण्याची धमकी दिली होती. त्यानंतर रुबीना बी. खूपच अस्वस्थ आणि शांत झाली होती. रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर तिने टोकाचे पाऊल उचलले. ७ मे रोजी सकाळी कुटुंबीयांना फोनद्वारे माहिती मिळाल्यानंतर ते चिखली येथील सरकारी रुग्णालयात पोहोचले असता रुबीना बी. मृतावस्थेत आढळून आली. रात्री तिने खरात यांच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले.
या घटनेनंतर चार चिमुकल्या मुलांच्या डोक्यावरून आईचे मायेचे छत्र हरपले आहे. घरात शोककळा पसरली असून नातेवाईकांचा आक्रोश पाहून परिसरातील नागरिकही हळहळ व्यक्त करीत आहेत.
चिखली पोलिसांनी महिला आरोपी सुलताना बी. सलीम शेख हिच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेमुळे अवैध सावकारी, मानसिक छळ आणि महिलांवरील वाढत्या दबावाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. परिसरात संतापाची लाट असून दोषींवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.





Social Plugin