मुन्ना येरेकार ग्रामीण प्रतिनिधी वणी

झारी जामणी तालुक्यातील बोलापूर ते रासा या ९ किलोमीटर अंतराच्या मुख्य रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. परिसरातील अनेक गावांसाठी हा रस्ता दळणवळणाचा मुख्य मार्ग असूनही, गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडून या रस्त्याची कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.

गिट्टी उखडली, अपघाताचा धोका वाढला

दीर्घ काळापासून दुरुस्ती न झाल्यामुळे संपूर्ण रस्त्यावर मोठमोठ्या खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावरील गिट्टी जागोजागी उखडली असून दुचाकी तसेच चारचाकी वाहने चालवणे अत्यंत कठीण व धोक्याचे झाले आहे. यातच पावसाळ्याच्या दिवसांत खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने वाहनधारकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही, ज्यामुळे लहान-मोठे अपघात नित्यनियमाने घडत आहेत.

बोलापूरवासियांची तात्काळ दुरुस्तीची मागणी

या मार्गावरून प्रवास करताना रुग्ण, शाळकरी विद्यार्थी आणि शेतकरी वर्ग यांचे अतोनात हाल होत आहेत. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या रस्त्याची प्रशासनाने दखल घेऊन तात्काळ डांबरीकरण किंवा दुरुस्तीचे काम सुरू करावे, अशी जोरदार मागणी बोलापूर आणि परिसरातील गावकऱ्यांनी केली आहे.