Ticker

6/recent/ticker-posts

*लोणार येथे ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; मानवी साखळीद्वारे सामूहिक नशामुक्तीची शपथ*



शारीक शेख @ ग्रामीण प्रतिनिधी 

लोणार  18.10.26

अमृत सेवाभावी संस्था, परभणीद्वारा संचालित कै. कु. दुर्गा क. बनमेरू विज्ञान महाविद्यालय, लोणार येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या वतीने व कै. कमलाबाई बनमेरू महिला महाविद्यालय, लोणार यांच्या संयुक्त विद्यमाने संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या ‘१०० रविवार – नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत रविवार, दि. १८ ऑक्टोबर २०२६ रोजी लोणार सरोवर परिसरात भव्य मानवी साखळी तयार करून सामूहिक नशामुक्ती शपथ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ग्रामदैवत श्री कमळजामाता यांच्या नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच नवरात्रोत्सवासाठी उपस्थित भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले. अमृत सेवाभावी संस्था, परभणीचे सचिव डॉ. संतोष बनमेरू, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रकाश बनमेरू आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय समन्वयक डॉ. कमलाकर वाव्हळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र भिसे यांनी अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. युवकांमध्ये व्यसनमुक्तीविषयी जनजागृती निर्माण करणे, व्यसनांपासून दूर राहण्याचा संकल्प दृढ करणे आणि निरोगी, सुदृढ व जबाबदार समाजाच्या निर्मितीसाठी तरुणांना प्रेरित करणे, हा या अभियानाचा मुख्य हेतू असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी डॉ. संतोष बनमेरू आणि डॉ. कमलाकर वाव्हळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तंबाखू, गुटखा, मद्य आणि इतर व्यसनांमुळे युवकांच्या आरोग्यावर, शैक्षणिक प्रगतीवर तसेच सामाजिक जीवनावर गंभीर दुष्परिणाम होतात. त्यामुळे युवकांनी स्वतः व्यसनांपासून दूर राहण्याबरोबरच आपल्या मित्रपरिवारात आणि समाजातही व्यसनमुक्तीचा संदेश पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

मानवी साखळीच्या माध्यमातून एकता, सामाजिक बांधिलकी आणि व्यसनमुक्त समाजनिर्मितीचा प्रभावी संदेश देण्यात आला. उपस्थितांनी व्यसनांपासून दूर राहण्याची तसेच इतरांनाही व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी प्रेरित करण्याची सामूहिक शपथ घेतली. राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, लोकसहभाग आणि राष्ट्रनिर्मितीची भावना वृद्धिंगत करण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित झाले.

‘व्यसनाला नकार, निरोगी जीवनाचा स्वीकार’ हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवून विकसित भारताच्या निर्मितीत युवकांनी सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन या उपक्रमातून करण्यात आले.