१२ दिवसांच्या मेगाब्लॉकवर प्रवासी संघटनांचा संताप;
“प्रवाशांना वाऱ्यावर सोडू नका!”
रेल्वे प्रवासी संघटनांना विश्वासात न घेतल्याचा आरोप; पर्यायी वाहतूक व्यवस्थेची मागणी
कल्याण | प्रतिनिधी : प्रफुल्ल शेवाळे
कल्याण–कसारा रेल्वे मार्गावर ७ ते १८ ऑक्टोबरदरम्यान १२ दिवसांचा विशेष मेगाब्लॉक जाहीर करण्यात आल्याने या मार्गावरील हजारो प्रवाशांच्या दैनंदिन प्रवासाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. तांत्रिक व पायाभूत सुविधांच्या कामांसाठी ब्लॉक आवश्यक असला, तरी ब्लॉकपूर्व नियोजन, प्रवासी संघटनांशी समन्वय आणि पर्यायी वाहतूक व्यवस्था याबाबत रेल्वे प्रशासनाची भूमिका काय आहे? असा थेट सवाल प्रवासी संघटनांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
“प्रवासी संघटनांना विश्वासात का घेतले जात नाही?”
कल्याण–कसारा रेल्वे पॅसेंजर वेल्फेअर असोसिएशनचे सल्लागार जितेंद्र विशे आणि शैलेश राऊत यांनी रेल्वे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आक्षेप नोंदवला आहे.
ब्लॉक जाहीर करण्यापूर्वी स्थानिक प्रवासी संघटनांना विश्वासात घेतले जात नाही, तसेच ब्लॉकच्या कालावधीत लोकल प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयींचा विचार करून पर्यायी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत ठोस नियोजन केले जात नाही, असा आरोप त्यांनी केला.
दररोज कामानिमित्त मुंबई, ठाणे, कल्याण तसेच नाशिक परिसरात ये-जा करणाऱ्या हजारो प्रवाशांसाठी लोकल ही प्रमुख वाहतूक व्यवस्था आहे. त्यामुळे दीर्घकाळ चालणाऱ्या ब्लॉकच्या काळात प्रवाशांच्या वेळेचा, सुरक्षिततेचा आणि दैनंदिन रोजगाराचा विचार करून प्रशासनाने पर्यायी बससेवा, अतिरिक्त वाहतूक व्यवस्था तसेच स्पष्ट आणि आगाऊ सूचना देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
“प्रवाशांना वाऱ्यावर सोडणे हीच प्रशासनाची पद्धत आहे का ?”
दरम्यान, कल्याण–कर्जत–कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष राजेश घनघाव यांनीही रेल्वे प्रशासनावर तीव्र शब्दांत टीका केली.
ब्लॉकच्या काळात प्रवाशांना आवश्यक सुविधा व पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्याऐवजी “प्रवाशांना वाऱ्यावर सोडण्याचे काम रेल्वे प्रशासनाकडून नियमितपणे केले जाते,” अशी घणाघाती टीका घनघाव यांनी केली.
रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या विकासकामांना प्रवाशांचा विरोध नसून, कामाच्या नावाखाली प्रवाशांना होणाऱ्या त्रासाचे व्यवस्थापन कोण करणार? हा मूलभूत प्रश्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
प्रशासनाने तातडीने कृती आराखडा जाहीर करावा
१२ दिवसांच्या ब्लॉकच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाने केवळ ब्लॉकची घोषणा न करता प्रवाशांसाठी स्वतंत्र कृती आराखडा जाहीर करावा, अशी मागणी प्रवासी संघटनांकडून होत आहे.
यामध्ये—
🔴 ब्लॉकच्या प्रत्येक दिवसाचे लोकल वेळापत्रक स्पष्ट करावे.
🔴 रद्द अथवा शॉर्ट-टर्मिनेट होणाऱ्या लोकलची पूर्वसूचना द्यावी.
🔴 आसनगाव–कसारा परिसरासाठी पर्यायी बस वाहतूक व्यवस्था उपलब्ध करावी.
🔴 गर्दीच्या वेळेत अतिरिक्त वाहतूक व्यवस्था करावी.
🔴 स्थानकांवर प्रवाशांना मार्गदर्शन करण्यासाठी अतिरिक्त कर्मचारी नियुक्त करावेत.
🔴 प्रवासी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत तातडीने समन्वय बैठक घ्यावी.
🔴 ब्लॉकदरम्यान निर्माण होणाऱ्या गर्दी व वाहतूक कोंडीचे व्यवस्थापन करण्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधावा.
“कामे करा; पण प्रवाशांचा विचार करून!”
रेल्वेच्या विकासकामांना विरोध नसून विकासकामांच्या नियोजनात सर्वसामान्य प्रवाशांचा केंद्रबिंदू म्हणून विचार करणे आवश्यक आहे, अशी भूमिका दोन्ही प्रवासी संघटनांनी मांडली आहे.
आता रेल्वे प्रशासन या गंभीर आक्षेपांची दखल घेऊन प्रवासी संघटनांना चर्चेत सहभागी करून घेते का, पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करते का आणि १२ दिवसांच्या ब्लॉकदरम्यान लाखो प्रवाशांचा त्रास कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करते का, याकडे कल्याण–कसारा रेल्वे पट्ट्यातील प्रवाशांचे लक्ष लागले आहे.





Social Plugin