कळंबोलीत पाण्यासाठी बोंबाबोंब; सिडकोच्या टाकीतून भरलेला टँकर बांधकामस्थळी!
कळंबोली प्रतिनिधी |श्री.अवधूत साळुंखे|: कळंबोली परिसरात नागरिकांना अपुऱ्या प्रमाणात तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी सुरू असतानाच सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या टाकीतून पाणी भरून निघालेला टँकर सेक्टर १४, कळंबोली येथील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला पाणीपुरवठा करताना आढळून आल्याने पाणीवाटपाच्या व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
कळंबोलीतील समाजसेवक प्रशांत रणवरे यांच्या निदर्शनास हा प्रकार आल्यानंतर त्यांनी संबंधित टँकरचा पाठलाग केला. त्यानंतर सेक्टर १४,कळंबोली येथील बांधकामस्थळी टँकरमधून पाणी सोडले जात असल्याचे आढळून आले. त्यामुळे सिडकोच्या टाकीतून भरलेले पाणी नेमके कुठे आणि कोणाच्या परवानगीने वापरले जात आहे, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकाराबाबत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी प्रशांत चहारे यांनी टँकरचालकाने परस्पर हा प्रकार केल्याचे सांगितले असून, संबंधित चालकावर योग्य ती कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, कळंबोलीतील अनेक भागांत नागरिकांना अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. काही भागांत तर ठराविक वेळेत पाणी उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशा परिस्थितीत सिडकोच्या पाणीपुरवठा यंत्रणेतील टँकर बांधकामस्थळी पाणी देताना आढळल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.





Social Plugin