दिनकर वाईकर / पाटण प्रतिनिधी -
सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेल्या पाटण येथील दर्ग्याच्या उरुसानिमित्त पुणेवाले चिश्ती परिवाराच्या वतीने आयोजित भव्य मोफत आरोग्य शिबिर पार पडले . याचा लाभ पाटणसह परिसरातील हजारों रुग्णांनी घेतला .
या आरोग्य शिबीरात जवळपास एक हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी पार पडली तर सहाशे ते सातशे लोकांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व लवकरच दोनशे रुग्णांची मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे . जनरल तपासणी व इतर तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली व ई . सी. जीही मोफत काढण्यात आल्याची माहिती हजरत शेख मोहम्मद खलील चिश्ती यांनी दिली.
याबाबत सविस्तर माहिती अशी, खानका हजरत ख्वाजा गरीब नवाज बंदानवाज गेसूदराज व एच . व्ही . देसाई आय सेंटर , कृष्णा विश्व विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने पाटण रामापूर याठिकाणी आरोग्य शिबीर , सर्व रोग निदान व तपासणी शिबीर आयोजित केले होते .
शिबीरामध्ये नेत्र तपासणी , मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया व चष्मे वाटप करण्यात आले . जनरल तपासणी , कान नाक घसा तपासणी , स्रीरोग व वंध्यत्व , लहान मुलांची तपासणी , अस्थिरोग , मानसोपचार , दंत तपासणी , ह्रदय (ई . सी . जी . ) आदी तपासण्या झाल्या .
पाटणसह परिसरातील अनेक लोकांनी याचा लाभ घेतला . शिबीरात आलेल्या रुग्णांना मोफत अन्नदान करण्यात आले . याचा फायदा अनेक गरजवंत व गरजू लोकांना झाला . या उपक्रमामुळे पुणेवाले उरुस कमिटी चे सर्वत्र कौतुक केले जात आहे . या शिबीरास पाटण नगरपंचायतीचे नगरसेवक , नगरसेविका व राजकीय , सामाजिक , सांस्कृतिक स्तरावरील लोकांनी भेट देत शुभेच्छा दिल्या व कौतुक केले .





Social Plugin