Ticker

6/recent/ticker-posts

बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक बचत होण्याऐवजी सर्वसामान्य सदस्य महिलांना नाहक मनस्ताप



*सामाजिक दायित्व जपत गोरगरीब महिलांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहणार: खालेद चाऊस*


अंबड/प्रतिनिधी गणेश सपकाळ

बचत गट हा एक सामाजिक- आर्थिक उपक्रम आहे.ही प्रक्रिया संघटितपणे एकमेकांना समजून घेत होत असल्याने या रचनेला स्वयंसाहाय्य गट असेही संबोधले जाते. गटाला काहीतरी विशिष्ट नाव ठेवले जाते, उदा. जागृती बचत गट, अस्मिता बचत गट इ. बचत गट म्हणजे ठराविक काळाने बचत जमा करण्याच्या निमित्ताने एकत्र येणारा गट होय. हा नाबार्डचा सूक्ष्म वित्त पुरवठ्याचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे.बचत गटाचे सदस्य केवळ महिला, केवळ पुरुष अथवा मिश्र म्हणजेच महिला पुरुष एकत्र असेही असू शकते. ही संख्या २० किंवा त्यापेक्षा कमी हवी.गटातील प्रत्येक सदस्य ठरलेल्या कालावधीने एकत्र येऊन बचत म्हणून ठराविक रक्कम गटात जमा करतो/ते. हा कालावधी आठवड्यातून एकदा किंवा महिन्यातून एकदा असतो.

ही जमा केलेली रक्कम बचत गटातील सदस्यांनाच कर्ज म्हणून मिळते.कर्ज सभासदाने हप्‍त्या-हप्‍त्याने बचत गटाला परत करणे अपेक्षित असते.

बचत गटाच्या व्यवहारासाठी बचत गटाचे सदस्य - कर्ज द्यायचे का, द्यायचे ठरल्यास किती दराने द्यायचे, कोणाला द्यायचे, परतफेडी विषयी नियम वगैरे ठरवतात.बचत गट ही लोकशाही तत्त्वावर आधारित रचना आहे त्यामुळे गटातील प्रत्येक सभासदाला समान अधिकार असतो.

सद्यस्थितीत अंबड शहरांमध्ये दहा ते बारा सूक्ष्म अर्थसाह्य करणाऱ्या फायनान्शियल कंपनीच्या माध्यमातून कर्ज स्वरूपात अर्थसहाय्य केले जाते. एका बँकेत किमान 300 महिला बचत गटाशी जोडलेले आहेत. परंतु आरबीआयच्या नियमानुसार महिनेवारी वसुली होते का? आर्थिक परिस्थिती न पाहता बचत गटातील सदस्य महिलांना कर्जपुरवठा केला जातो? आणि नंतर वेळेवर हप्ते न भरल्यामुळे त्यांना मानसिक त्रास दिला जातो. यामुळे अनेक महिलांचे संसार उघडे पडले असून, मानसिक ताण-तणावातून त्यांना आत्महत्या करण्याची वेळ आल्याचे दिसून येत असल्याचे मत अंबड शहरातील सामाजिक कार्यकर्ते खालेद चाऊस यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

अवेळी व रात्री अपरात्री हप्ते वसुलीसाठी फायनान्शियल कंपनीचे कर्मचारी येत असल्यामुळे अनेक महिलांचे संसार उध्वस्त होण्याची वेळ येत असल्याचेही गंभीर बाब यावेळी त्यांनी निदर्शनास आणून दिली.

बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वयं अर्थसहाय्य करण्याबाबत कसल्याही प्रकारचे आडकाठी नाही परंतु माणुसकी व सामाजिक दायित्वातून नियमांचे काटेकोरपणे पालन होणे गरजेचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. तसेच येणाऱ्या काळात प्रशासन दरबारी कायदेशीर रित्या योग्य तो पाठपुरावा करून जन आंदोलन उभारण्याचेही खालेद चाऊस यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले