Ticker

6/recent/ticker-posts

पुसेगाव महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन समारंभ संपन्न



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

रयत शिक्षण संस्थेचे, कला व वाणिज्य महाविद्यालय पुसेगाव  येथे राष्ट्रीय सेवा योजना उद्घाटन समारंभ संपन्न झाला. या उद्घाटन समारंभांचे उद्घाटक व प्रमुख पाहुणे म्हणून  राष्ट्रीय सेवा योजना सातारा जिल्हा समन्वयक मा.डॉ नंदकुमार माने होते. ते सध्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा येथे कार्यरत आहेत. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना ते म्हणाले, " आजचा विद्यार्थी हा व्हॉट्सअप संस्कृतीतील व  मोबाईल संस्कृतीतील आहे. विद्यार्थ्यांमध्ये जिद्द चिकाटी, मेहनत करण्याची तयारी असेल तरच तो जीवनात यशस्वी होऊ शकतो. मन ,मनगट  व मेंदू ही कर्मवीर अण्णांनी सांगितलेली त्रिसूत्री आज आचरणात आणण्याची गरज आहे. सर्वत्र आज रयत शिक्षण संस्थेचा नावलौकिक आहे .रयत शिक्षण संस्थेचा विद्यार्थी आज सहज ओळखला जातो. कारण त्या विद्यार्थ्याकडे श्रम करण्याची , कष्ट करण्याची धमक आहे.  रयतचे संस्कार त्याच्या रक्तात भिनले आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेमुळे मुलांचा बौद्धिक, शारीरिक, मानसिक, सामाजिक व सांस्कृतिक असा सर्वांगीण विकास होतो. महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना, एन.सी.सी,स्पोर्ट व सांस्कृतिक विभाग हे चार विभाग कार्यरत असतात. कष्टाला पर्याय नाही, कष्ट करा, कष्टाला प्राधान्य द्या, सेवाभावीवृत्ती बाळगा, कुटुंबाची, समाजाची, देशाची सेवा करा.राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे शिस्त, नियोजन ,आयोजन, नेतृत्व, संभाषण कौशल्य, सभाधारिष्टपणा या गुणांचा विकास होय" .आज वाचनसंस्कृतीचा ऱ्हास व्हायला लागला आहे, अशी ही खंत बोलताना त्यांनी व्यक्त केली. 

            कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी  उत्कृष्ट मंडल अधिकारी पुरस्कार मिळालेले पुसेगावचे अशोक साबळे उपस्थित होते. महाविद्यालयाच्या वतीने त्यांचाही सत्कार करण्यात आला .त्यावेळी त्यांनीही आपले मनोगत व्यक्त करून विदयार्थांना मार्गदर्शन केले. यावेळी महाविद्यालयातील ग्रंथपाल डॉ. संजय क्षीरसागर हेही उपस्थित होते. 

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. राजेंद्र भोसले  हे होते. त्यांनी आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्रा. लालासाहेब पवार यांनी केले.  सूत्रसंचलन मराठी विभागातील प्रा. महेश आवळे यांनी केले तर आभार प्रा. किरण कुंभार यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल जगताप, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी  प्रा.किरण कुंभार, सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर सेवक व विद्यार्थी-विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.