पत्रकार : गावित चंद्रकांत ग्रामीण प्रतिनिधी
मोखाडा : निसर्ग हाच आदिवासी समाजाचा खरा गुरू आणि जल, जंगल, जमीन हेच जीवनाचे आधारस्तंभ! महाराष्ट्रातील म. ठाकूर, क. ठाकूर, महादेव कोळी, कातकरी, कोकणा, कोकणी, भिल्ल आणि वारली आदी आदिवासी जमाती शेकडो वर्षांपासून निसर्गातील विविध घटकांना दैवत मानून त्यांची पूजा करीत आल्या आहेत. याच निसर्गपूजेतील महत्त्वाचा सण म्हणजे वाघबारस! या दिवशी वाघदेव, नागदेव, चंद्र, सूर्य, मोर, विंचू तसेच झाडांचे पूजन केले जाते. आदिवासी श्रद्धेनुसार वाघ हा केवळ भयाचे प्रतीक नसून जंगलाचा स्वामी आणि रक्षक मानला जातो. वाघदेवतेच्या पूजनातून वन्यजीवांचे संरक्षण, गुराढोरांची सुरक्षितता आणि मानव-निसर्ग सहअस्तित्वाचा संदेश दिला जातो.
दिवाळीच्या उत्सवात शहरी भागात रोषणाई, आकाशकंदील, फटाक्यांची आतषबाजी, गोडधोड पदार्थ आणि नवीन कपड्यांची खरेदी यांना महत्त्व असते; तर आदिवासी समाज वाघबारससारखे पारंपरिक सण निसर्गाच्या सानिध्यात साजरे करतो. निसर्गातील प्रत्येक घटकाप्रती कृतज्ञता व्यक्त करणे, त्याचे रक्षण करणे आणि पर्यावरणाशी नाते जपणे ही या परंपरेची खरी ओळख आहे. आधुनिक काळातही आपल्या पूर्वजांनी दिलेला हा सांस्कृतिक वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मोखाडा तालुक्यातील करोळ-पाचघर गावातील तरुणांनी वाघबारस सणाच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. आदिवासी युवा फाउंडेशनच्या करोळ शाखेच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते उमाकांत झुगरे, ग्रामपंचायत सदस्य रामदास कामडी, पेसा अध्यक्ष कृष्णा कामडी, युवा कार्यकर्ते करण कामडी, सुरेश कामडी, वसंत कामडी, पांडुरंग कामडी, लहू कामडी, दादू आघान, अशोक यशवंत कामडी (बाबज्या कामडी), निलेश कामडी आणि चंदर कामडी यांनी या परंपरेच्या जतनासाठी योगदान दिले.
पूर्वजांची श्रद्धा, निसर्गाशी नाळ आणि नव्या पिढीचा संस्कृती जतनाचा संकल्प! करोळ-पाचघरमधील तरुणांनी वाघबारसच्या माध्यमातून आदिवासी संस्कृतीचा अभिमानास्पद जागर घडवून आणला आहे. वाघदेवतेची पूजा ही केवळ धार्मिक परंपरा नसून जंगलातील प्रत्येक जीवाबद्दल आदर व्यक्त करणारी आणि निसर्गासोबत सहजीवन जगण्याची शिकवण देणारी आहे. आपल्या मातीशी, जंगलाशी आणि पूर्वजांच्या संस्कृतीशी असलेले नाते जपणाऱ्या या तरुणांचा पुढाकार निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे. आदिवासी संस्कृतीचा हा वारसा केवळ आठवणीत नाही, तर नव्या पिढीच्या कृतीतून आजही जिवंत आहे!





Social Plugin