महिलांना मिळतोय सन्मानाचा मान : अनिष्ट प्रथा बंद करण्याचा संकल्प
बुध दि . [ प्रकाश राजेघाटगे ]
पतीच्या निधनानंतर महिलांना सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांमध्ये दुय्यम वागणूक देण्याच्या प्रथा बंद करून त्यांना सन्मानाने जगता यावे, यासाठी जयहिंद फाउंडेशनच्या खटाव तालुका टीमच्यावतीने 'विधवा मुक्त गाव' हा उपक्रम राबवण्यात येत आहे. टीमच्या अध्यक्षा हेमलता किसन फडतरे आणि सचिव पूनम यशवंत साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या या सामाजिक चळवळीला महिला, पुरुष, तरुण-तरुर्णीसह ज्येष्ठ नागरिकांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत सातारा, सांगली, पुणे आणि सोलापूर जिल्ह्यांतील २२ गावे विधवामुक्त झाली आहेत.
पुरातन काळापासून विधवा महिलांना अनेक सामाजिक बंधने आणि अनिष्ट रूढींना सामोरे जावे लागत होते. पतीच्या निधनानंतर धार्मिक व मंगलकार्यांमध्ये त्यांना सहभागी होण्यापासून रोखले जात असे. या प्रथांमुळे महिलांना मानसिक त्रास सहन करावा लागत होता. विधवा महिलांकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलून त्यांना उर्वरित आयुष्य सन्मानाने आणि आनंदाने जगता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत गावातील विधवा महिलांना एकत्र करून त्यांचे औक्षण केले जाते. त्यांना साखरभरवून, हळदी-कुंकू लावून आणि ओटी भरून सन्मानित केले जाते. वीरपत्नींसह अन्य विधवा महिलांनाही धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांत सन्मानाने सहभागी करून घेण्याचा संकल्प ग्रामस्थ करतात. महिलांच्या सन्मानार्थ टाळ्यांचा कडकडाट करून विधवा मुक्त गावाच्या निर्णयाचे स्वागत केले जाते. विधवा महिलांबाबतच्या अनिष्ट प्रथा बंद करण्यासाठी ही चळवळ संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक स्वरूपात राबवण्याची गरज आहे. यासाठी शासनानेही पुढाकार घेऊन अशा उपक्रमांना सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. या उपक्रमामुळे विधवा महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळवून देण्यास मदत होत असून, सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल पडत आहे.
विधवामुक्त झालेली गावे
खटाव तालुका : पुसेगाव, फडतरवाडी (नेर), काटेवाडी, बुध, डिस्कळ, पांगरखेल, भुरकवडी, पेडगाव, मोळ.
कोरेगाव तालुका : नागाचे कुमठे, सासुर्वे.
माळशिरस तालुका : दहिगाव.
बारामती तालुका : कांबळेश्वर, लाटे, मुरूम.
कवठेमहांकाळ तालुका : अग्रण धुळगाव.
तासगाव तालुका : आरवडे.
सातारा तालुका : पोगरवाडी, काळोशी, मिलिटरी अपशिंगे.
वाई तालुका : अनपटवाडी.
.jpg)




Social Plugin