Ticker

6/recent/ticker-posts

महिला मंडळ अधिकारी व महिला तलाठी यांनी रस्त्याचा वाद मिटविला




ग्रामीण प्रतीनिधी अंबादास गायकवाड वडीगोद्री 

जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड तालुक्यात महसूल विभाग १ ऑगस्टपासुन महसूल पंधरवाडा राबवत आहे.या पंधरवाड्यात नागरिकांना अधिकाधिक सोयी सूविधा देण्यात येऊन नागरिकांची कामे सुकर करण्यासाठी तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्यासह तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी प्रयत्नशील आहेत .  याचाच भाग म्हणून ताडहादगाव मंडळाच्या मंडळ अधिकारी  अश्विनी देशमुख  यांनी कामांचा धडाका लावला आहे .महसूल पंधरवाड्याच्या निमित्तानं  दिनांक 02 ऑगस्ट रोजी मौजे पराडा येथील रस्ता प्रकरण सर्वांना सोबत घेऊन त्यांनी परस्पर संमतीने निकाली काढले .

  प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की मौजे पराडा येथील गट नं 179 मधील शेतकऱ्यांना जाण्यायेण्याचा रस्ता जवळपास दोन महिन्यापासून बंद होता . खातेदार  विलास पाटोळे व वैजीनाथ पाटोळे यांनी वहीवाटीचा वीस फुटाचा रस्ता  काट्या टाकून अडवला होता .  त्यामुळे गटातील इतर खातेदार यांना जाण्यायेण्यास रस्ता नव्हता .  तसा बाबासाहेब रामदास आरसुळ यांनी अर्ज दिला होता .

  त्यावर  अंबडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके  यांनी 19 जुलै रोजी  मंडळ अधिकारी यांना पत्र काढून अहवाल मागितला होता .  कार्यालयातील महसूल सहायक गजानन महानूर यांनी संबंधित शेतकरी यांना  नोटिसा काढून त्यांना जायमोक्यावर हजर राहण्यास सांगितले .  मंडळ अधिकारी अश्विनी देशमुख व तलाठी कल्पना इंगळे यांनी सर्वांना विश्वासात घेवून  समोरासमोर बसवुन रस्त्याचे आपसात वाद घालून कोणाचेही प्रश्न मिटत नसतात हे पटवून दिले . नायब तहसीलदार धनश्री भालचिम यांचे मार्गदर्शन घेतले . शेतकऱ्यांनीही यास प्रत्युत्तर म्हणून आमच्यातील वाद आम्ही मिटवत आहोत , असे म्हटले .  त्यामुळे  वहीवाटीचा रस्ता मोकळा झाला . यावेळी भाऊसाहेब भानुदास आरसुळ ,  संजय आसाराम आरसुळ  , सुभाष आसाराम आरसुळ , गोरख एकनाथ आरसुळ , सय्यद शारुख अहमद,   तंटामुक्ती अध्यक्ष शशिकांत कुलकर्णी  तसेच सरपंच सय्यद आवेज सय्यद शरीफ हे उपस्थित होते .

      महिला मंडळ अधिकारी अश्विनी देशमुख व तलाठी कल्पना इंगळे यांनी यांनी सामोपचाराने रस्त्याचा वाद मिटविल्यामुळे गावकऱ्यांतून समाधान व्यक्त करण्यात आले . तसेच अशा महिला अधिकारी कर्मचारी असतील तर परिसराचा आणि गावाचा विकास होण्यास वेळ लागणार नाही अशी प्रतिक्रिया गावकऱ्यांनी व्यक्त केली .

        तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नमूद केले की जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ , अपर जिल्हाधिकारी रिता मेत्रेवार ,  निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ , उपविभागीय अधिकारी दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड तालुक्यात मागच्या सहा महिन्यात शंभर किलोमीटरपेक्षा जास्त लांबीचे रस्ते मोकळे करण्यात आलेले आहेत . यासाठी महसूल विभाग कसोशीने प्रयत्न करत आहे.शेतकऱ्यांना रस्त्याचे प्रश्न भेडसावत असतील तर त्यांनी संबंधित मंडळ अधिकारी,तलाठी अथवा तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा असेही आवाहन त्यांनी केले.