Ticker

6/recent/ticker-posts

संस्कारांची शिदोरी हरवू देऊ नका : चंदनशिवे



बुध  दि [ प्रकाश राजेघाटगे ] 

आजच्या काळात युवकांमध्ये नकारात्मक विचार वाढत असून, समाजात विखारीपणा वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीत नव्या पिढीला संस्कारांची शिदोरी देणे, सकारात्मक विचार रुजविणे आणि आपल्या इतिहास-संतपरंपरेची ओळख करून देणे गरजेचे आहे. शिवाजी महाराज समजून घ्यावेत, तुकाराम गाथा समजून घ्यावी आणि महात्मा फुले यांच्या विचारांचा अभ्यास करावा, असे प्रतिपादन व्याख्याते नितीन चंदनशिवे यांनी केले.

श्री सेवागिरी व्याख्यानमालेत ते बोलत होते. आजच्या पिढीसमोर मोबाईल, सोशल मीडिया आणि वाढती स्पर्धा यांसारखी अनेक आव्हाने आहेत. मात्र या सगळ्यात माणूसपण जपणे सर्वांत महत्त्वाचे आहे. 'भक्तीचा सूर हवा, पण त्यासोबत विवेकाची आणि संस्कारांची जोडही आवश्यक आहे,' असे त्यांनी सांगितले.

मोबाईलच्या अतिवापरामुळे कुटुंबातील संवाद कमी होत चालला आहे. मुलांच्या प्रत्येक मागणीला पूर्ण करण्यासाठी आई-

वडील प्रयत्न करतात; मात्र संवादाचा अभाव आणि वाढत्या अपेक्षांमुळे कुटुंबव्यवस्थेवर परिणाम होत आहे. मोबाईलसाठी युवकाने आत्महत्या करण्याची घटना घडते, तर त्यानंतर आईनेही आत्महत्या केल्यासारख्या घटना समाजाला अंतर्मुख करणाऱ्या आहेत. घरात संवाद वाढला पाहिजे, मुलांना वेळ दिला पाहिजे आणि त्यांच्या भावविश्वाला समजून घेतले पाहिजे, असे चंदनशिवे यांनी नमूद केले.

शिक्षण क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेवरही त्यांनी भाष्य केले. आज केवळ गुण मिळवण्याची स्पर्धा सुरू असून, जणू संपूर्ण घरच दहावीच्या परीक्षेत बसलेले असते. गुण, करिअर आणि यशाच्या स्पर्धेत माणूसपण हरवता कामा नये, असे त्यांनी सांगितले. मुली स्वभावाने संवेदनशील असल्याने त्यांच्या भावविश्वाकडेही कुटुंबाने आणि

समाजाने गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

समाजातील विविध समस्यांकडे लक्ष वेधताना चंदनशिवे यांनी अन्नातील भेसळ, पेपरफुटी आणि शिक्षणातील गैरप्रकार याबाबतही चिंता व्यक्त केली. समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिकपणा, नैतिकता आणि जबाबदारीची जाणीव निर्माण झाली पाहिजे. अन्यथा केवळ शिक्षण घेऊनही समाज म्हणून आपण प्रगल्भ होणार नाही, असे त्यांनी सांगितले.

आजच्या पिढीला दोष देण्यापेक्षा तिला योग्य दिशा देण्याची गरज आहे. संस्कार, संवाद, संतविचार, इतिहास आणि महापुरुषांचे विचार यांची शिदोरी मुलांना दिली तर सकारात्मक आणि संवेदनशील समाज घडू शकतो, असा विश्वास नितीन चंदनशिवे यांनी व्यक्त केला.

यावेळी श्री सेवागिरी देवस्थानचे मठाधिपती श्री सुंदरगिरी महाराज, चेअरमन संतोष वाघ, विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव यांच्यासह श्रोते उपस्थित होते.