Ticker

6/recent/ticker-posts

शेत शिवारात वेळा अमावस्या उत्साहात साजरी



मोहन गुरव:-सुपतगाव प्रतिनिधी 

धाराशिव, लातूर जिल्ह्यासह सिमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील मराठी भाषिकांच्या अनेक गावात वेळा अमावस्यांची प्रथा कित्येक वर्षापासुन सुरु आहे.

  उमरगा, (जि. धाराशिव) - धाराशिव, लातूर जिल्ह्यासह सिमावर्ती भागातील कर्नाटक राज्यातील मराठी भाषिकांच्या अनेक गावात वेळा अमावस्यांची प्रथा कित्येक वर्षापासुन सुरु आहे. निसर्गाचा दगाफटका कितीही बसो, पण काळ्याआईची मनोभावे पुजन करत शेतकऱ्यांनी शेतातील उत्पन्ना समृद्धी व भरभराटी होण्याची मनोकामना व्यक्त करून सोमवारी (ता. 30) वेळा अमावस्या (येळवस) उत्साहात साजरी केली.

   दरम्यान यंदा रब्बीचे पीक जोमात आहे ; तरी सगळीकडे बहरदार असलेल्या पिक शिवारात शेतकरी कुटुंबांनी वनभोजनाचा आनंद घेतला.वेळा अमावस्याचा सण हा शेतकरी कुटुंबासाठी एक आनंदाची पर्वणीच असते. पाण्याची उपलब्धता असलेल्या शिवारातील पिके बहरात आले असले तरी पिकांवरील किड, अळीचे विघ्न दुर करण्याचा शेतकऱ्यांना खटापोट करावा लागतोय. दरम्यान अमावस्याच्या पुजेसाठी व विविध खाद्यपदार्थाच्या तयारीसाठी शेतकरी कुटुंबात रविवारपासुनच (ता.29) तयारी सुरू होती. सोमवारी सकाळी अंबिलाचं बिंदग डोक्यावर घेऊन जाण्याची लगभग शेतकऱ्यांमध्ये दिसून आली.

आता दळणवळणाची साधने वाढल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी बिंदग्याचा प्रवास वहानातुन करीत असल्याचेही चित्र दिसून आले. बैलगाडीतुन सहकुटुंब शेताकडे जाण्याची मजा औरच असते. पण क्वचित ठिकाणीच बैलगाडी दिसत आहे. अजुनही बरेच शेतकरी कुटुंबियांनी बैलगाडीतुन वेळ अमावस्येला जाण्याची प्रथा कायम ठेवली आहे.

शिवाय दुचाकी, चारचाकी व ट्रॅक्टरमधुनही शेताकडे शेतकरी कुटुंब जात असल्याचे चित्र दिसून आले. शेतात जाऊन शेतकरी कुटुंबांनी पाच पांडवाची विधीवत पुजा केली, त्यानंतर शेतातील ज्वारी, हरभरा, करडई पिकावर अंबिल शिंपडण्यात आले. पिकाच्या हिरवाईत बच्चे कंपनी मनसोक्त खेळाचा आनंद घेतला.सहकुटुंब, मित्र मंडळीच्या सहवासात वन भोजनाचा आनंद

बाजरीपासुन बनविलेले उंडे, बाजरी व ज्वारीच्या कडक भाकरी तसेच विविध पालेभाज्यापासुन बनविलेली भाजी (भज्जी), वांग्याचं कांद्याची भरीत, गव्हाची खीर, कोंदीच्या गोड पोळ्या, आंबट भात (खिचडा) आणि वरून चवदार अंबिलाचा घोट घेत दुपारी साडेबारानंतर शेत शिवारात वनभोजनाचा शेतकरी कुटुंब व मित्रपरिवारांनी मनसोक्त स्वाद घेतला. वनभोजनानंतर कडवट- अंबट बोरं, हिरव्या चिंचा आणि मधमाश्यांनी संकलित केलेल्या मोहळ मारून त्याचा आस्वाद घेण्यासाठी तरूण, चिमूकले बांधा, बांधावरून फिरत होते.