विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहारज्ञानाचे धडे

बुध  दि. (प्रकाश राजेघाटगे)

खटाव तालुक्यातील रणसिंगवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आठवडा बाजाराच्या धर्तीवर  सकाळी बाजार भरवण्यात आला होता. या बाजारात विद्यार्थ्यांनी भाजीपाला विकून व्यवहारज्ञानाचे धडे घेतले. या बाजारामुळे शाळेत किलबिलाट होता. 'भाजीपाला स्वस्त, फक्त एक दिवस', 'भाजी घ्या भाजी, ताजी ताजी भाजी', अशा आरोळ्या ऐकू येत होत्या. बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाला.  बाजाराचे उद्घाटन  शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अंकुश शिंदे , सरपंच सुखदेव रणसिंग , माजी उपसरपंच अविनाश रणसिंग , माजी अध्यक्ष बापूराव बागल , पोलीस पाटील सुनिल रणसिंग , तंटामुक्त अध्यक्ष सोमनाथ फडतरे , ह.भ.प. रणसिंग महाराज , उपसरपंच विठ्ठल मसुगडे , अंगणवाडी सेविका यांच्या हस्ते झाले.  विद्यार्थ्यांनी स्टॉलवर कांदे, कांद्याची पात, बटाटे , कोथिंबिर, पालेभाज्या, वांगी, मिरची, काकडी, हरभरा, गवती चहा, कडधान्ये, देशी कोंबड्यांची अंडी व खाद्यपदार्थांची विक्री केली. उपक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक चंद्रकांत गिरी अजित गायकवाड , शोभा शिरतोडे , रिना मंडले यांनी परिश्रम घेतले .