बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
यावर्षी आल्याच्या पिकाला चांगले उत्पन्न मिळूनही चांगला भाव न मिळाल्यामुळे आले उत्पादक शेतकरी हवालदील झाला आहे. अशा परिस्थितीत पाटणकर ऍग्रो हायटेक सर्विसेस बुध यांचे कडून नागनाथवाडी येथे राबवलेला आंतरपिकाचा प्रयोग अत्यंत यशस्वी ठरला आहे.
आल्यामध्ये अंतर्गत पीक म्हणून बहुदा मका, मिरची आदी जोडपिके घेण्याची पारंपारिक पद्धत आहे. परंतु याला छेद देत नागनाथवाडी येथील प्रगतशील शेतकरी श्री.बबनराव पाटणकर यांच्या शेतात पाटणकर ऍग्रो हायटेक सर्विसेस बुध यांचे मार्फत अभिनव प्रयोग म्हणून आले पिकात उन्हाळी बाजरीचे जोडपिक घेण्यात आले.
चांगले बियाणे, योग्य प्रकारची औषध फवारणी, आवश्यक खतांचा पुरेसा वापर व योग्यवेळी पाण्याचे नियोजन याचे सखोल मार्गदर्शन पाटणकर ऍग्रो सर्विसेसचे संचालक विशाल पाटणकर यांच्याकडून झाल्याने या उन्हाळी बाजरीचे विक्रमी उत्पन्न निघत असल्याची प्रचिती श्री. पाटणकर यांना आली आहे.
यावर्षी आले पिकाचा बाजारभाव कोसळूनही उन्हाळी बाजरीसारख्या अंतर्गत पिकाने काहीसे सावरले असल्याचे मत पाटणकर कुटुंबीयांच्याकडून व्यक्त होत आहे.
श्री. बबनराव पाटणकर हे श्री. नागनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष असून ग्रामीण भागात वारकरी संप्रदाय रुजवण्यासाठी ते गेली अनेक वर्ष प्रयत्नशील आहेत हे करत असतानाच शेती व्यवसायातही नेहमीच एक यशस्वी शेतकरी म्हणून ते परिसरात ओळखले जातात.
नेहमीपेक्षा आल्यातील आंतरपीक म्हणून घेतलेले बाजरीचे पीक हे अधिक उत्पन्न देणारे ठरले असल्याने या कल्पक आणि यशस्वी प्रयोगामुळे शेतकऱ्यांना नवी दिशा मिळाली असल्याचे परिसरातील अनेक शेतकरी मत व्यक्त करत आहेत. सर्व स्तरातून या अभिनव प्रयोगाचे कौतुक होत आहे.
शेतीमध्ये आज मोठ्या प्रमाणात सुधारणा होत असून काळाबरोबर शेतकऱ्यांनीही बदलले पाहिजे. नवनवीन प्रकारचे प्रयोग राबवून पारंपारिक व आधुनिक दोन्ही प्रकारच्या साधनांचा समन्वय साधून अभ्यासपूर्ण शेती केल्यास आजच्या युगातही शेती हा कौटुंबिक विकासाचा प्रमुख आधार बनू शकतो....... श्री. बबनराव पाटणकर. प्रगतशील शेतकरी तथा अध्यक्ष नागनाथ देवस्थान ट्रस्ट.





Social Plugin