Ticker

6/recent/ticker-posts

डीजी कॉलेजमधील विद्यार्थी करणार सुरक्षित ई-बँकिंग बाबत जनजागृती



बुध  दि .[प्रकाश राजेघाटगे ]

सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयातील व्यावसायिक अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभागाच्या वतीने सायबर सिक्युरिटी कॅम्पेन ई-बँकिंग सुरक्षिततेबाबत जनजागृती मोहीम हाती घेतली असून महाविद्यालयातील ५०० पेक्षा अधिक विद्यार्थी या उपक्रमांमध्ये सहभागी होणार आहेत. महाविद्यालयातील बँकिंग व फायनान्स विभागात शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांद्वारे प्रतिवर्षी बँकिंग क्षेत्रातील सायबर सुरक्षिततेबाबत विविध उपक्रम हाती घेतले जातात. सद्या बँकिंग क्षेत्रात सध्या होत असणारे सायबर धोकाधाडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाकडून विविध प्रयत्न केले जात असले तरी स्थानिक पातळीवरील लोकांचे खूप मोठ्या प्रमाणावर प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. 

 सायबर फ्रॉड, बँक अकाउंट हॅकिंग, मोबाईल बँकिंग मधील धोकाधडी याबाबत योग्य ती तांत्रिक माहिती उपलब्ध करून देऊन त्यांना या धोकाधाडीपासून वाचवण्यासाठी बँक मॅनेजमेंट विभाग हा सातत्याने विविध उपक्रम आयोजित करत आहे. यावर्षी देखील दिनांक २१ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत हे अभियान राबवले  जाणार असून प्रत्येक विद्यार्थी किमान पाच कुटुंबात जाऊन त्यांना बँकिंग क्षेत्रातील सायबर सुरक्षिततेबाबत घ्यावयाच्या दक्षतेची माहिती देणारी माहितीपत्रके देऊन त्यांचे प्रबोधन केले जाणार आहे. एटीएम कार्डचा सुरक्षित वापर, मोबाईल बँकिंग व इंटरनेट बँकिंगचा पिन व पासवर्ड ची सुरक्षितता, मोबाईल ॲपमधील सुरक्षितता याबाबत आवश्यक माहिती दिली जाणार आहे. एटीएम, इंटरनेट बँकिंग व मोबाईल बँकिंगचा  निष्काळजीपणे  होत असणाऱ्या वापरामुळे अनेक लोकांना आपण कष्टाने मिळवलेला पैसा गमवावा लागत आहे  व त्यामुळे अनेक जणांना पश्चाताप करण्याची वेळ येत आहे.  आर्थिक गुन्हा घडल्यानंतर त्यावरती उपाययोजना करण्यापेक्षा अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत  यासाठी आवश्यक ती माहिती सर्वसामान्य लोकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.  समाजातील लोकांना सायबर सुरक्षिततेबाबत  अधिक जागृत करणे  हे शिक्षक म्हणून  आमची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे मत या प्रकल्पाचे समन्वयक प्रा. डॉ. विजय कुंभार यांनी व्यक्त केले. 

बँक मॅनेजमेंट विभागातील सर्व विद्यार्थी या उपक्रमामध्ये अत्यंत उत्साहाने सहभागी होत असून हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व जास्तीत जास्त जनतेपर्यंत ही बँकिंग सेवेबाबतच्या सुरक्षिततेची माहिती पोहोचवण्याकरिता महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडणार आहे असे मत डॉ. राजशेखर निल्लोलू यांनी व्यक्त केले.  विभागाने आयोजित केलेला हा स्तुत्य उपक्रम असून अत्यंत ज्वलंत व समाजउपयोगी आणि सामान्य जनतेची मुलभूत समस्या सोडवण्यासाठी हा प्रकल्प हाती घेत असल्याचे मत महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. गणेश जाधव यांनी व्यक्त केले व सर्व विद्यार्थ्यांना या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या. माहितीपत्रकाचे अनावरण करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य, . डॉ. गणेश जाधव, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. तुळशीराम महानवर, विभाग प्रमुख प्रा. डॉ. विजय कुंभार, विभाग प्रमुख डॉ. राजशेखर निल्लोलू, प्रा. रोहिणी भोसले, प्रा. श्रीकांत गंगावणे, श्री. अशोक मसने, प्रा. प्राजक्ता कुंभार, प्रा. पूजा जाधव, प्रा. तनुजा धोत्रे, प्रा.वेदांतिका कदम आदि शिक्षक व विभागातील विद्यार्थी उपस्थित होते.