Ticker

6/recent/ticker-posts

पाटण येथे पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध,,



पाटण (दिनकर वाईकर) 

पाटण येथे सर्व धर्मीयांच्या वतीने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत पावलेल्या निष्पाप पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाकिस्तानने केलेला हा भ्याड हल्ला फक्त आपल्या नागरिकांवर नाही तर आम्हां भारतीयांच्या सार्वभौमत्वावर केला आहे. आज पर्यंत आपण भारतीयांनी खुप सहन केले आहे. पाकिस्तान आणि पाकिस्तानचा हा अमानुष दहशतवाद मुळापासून उखडून टाकण्यासाठी आम्हीं सर्व भारत सरकार सोबत आहोत. आता प्रत्येकाने आपला राजकीय पक्ष, जात, धर्म, संघटना विसरुन आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री मा. अमित शहाजी व देशाचे संरक्षण मंत्री मा. राजनाथ सिंह जो निर्णय घेतील तो मान्य करुन भारतीय म्हणून एक राहुया. 

       यावेळी बोलताना याज्ञसेन पाटणकर म्हणाले, या दहशतवाद्यांना भारतीय सरकारने कोणत्याही प्रकारची दयामाया न दाखवता त्यांना व त्यांना मदत करणाऱ्यांना शोधून काढून त्यांचा शेवट करावा. गेल्या १० वर्षात भारतात सरकारने केलेल्या विकासकामांमुळे काश्मीर मधील पर्यटन बहरले होते. तेथील लोकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला होता. त्यामुळे येथील प्रत्येक काश्मीरी नागरीक स्वतःला भारतीय समजू लागला होता. हेच पाकिस्तानला पहावले नाही आणि त्यांनी येथील लाखो स्थानिक काश्मीरी नागरिकांच्या रोजगारवर घाला घातला. आज येथील रोजगार बुडाल्यामुळे  येथील लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याला पाकिस्तानच जबाबदार आहे ये स्थानिक लोकांना समजले आहे. त्यामुळे काश्मीर मधील स्थानिक सुध्दा भारत सरकारच्या सोबत आहेत आता आपणही सर्व जण भारत सरकारच्या पाठीशी राहुया असे त्यांनी सांगितले. यावेळी पाकिस्तान व दहशतवाद्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

         यावेळी पाटण शहर व परिसरातील विविध पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी, सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.