बुध . दि .[प्रकाश राजेघाटगे ]
कोरेगाव मतदारसंघात आम्ही सव्वालाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्टने सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा पाच हजार झाडे लावली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या शब्दाला मान देऊन अग्रणी बँक असणाऱ्या बँक ऑफ महाराष्ट्रने सीएसआर फंडातून पुसेगाव ग्रामपंचायतीला पाण्याचा टैंकर दिल्याने या झाडांना पाणी देण्याबरोबरच इतर सामाजिक उपक्रम राबवता येणार असल्याचे प्रतिपादन ना. महेश शिंदे यांनी केले.
जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या उपस्थितीत पुसेगाव ग्रामपंचायतीला टँकर प्रदान करण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बँकेचे अंचल प्रबंधक सौरभसिंग, महेश कुरेकर, नितीन तळपे, चीफ मॅनेजर सागर मोरे, सागर जगताप, नितीनराज साबळे, माधव तमनबोईडवाड, सेवागिरी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त रणधीर जाधव,बाळासाहेब जाधव, सरपंच घनश्याम मसणे, उपसरपंच विशाल जाधव उपस्थित होते.
ना. महेश शिंदे म्हणाले, मतदारसंघात काँक्रिट रस्ते आणि भुयारी रस्त्यांची ९० टक्के कामे पूर्ण झाली आहेत. अनेक ग्रामीण आणि पाणंद रस्तेही झाले आहेत. सातारा-लातूर राष्ट्रीय महामार्गाचे काम करताना मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली होती. पंचमहाभूतांचे रक्षण करणे आपले कर्तव्य असल्याने आम्ही सव्वालाख झाडे लावण्याचा संकल्प केला आहे. जिल्हाधिकारी आणि जिल्हा प्रशासन आमच्या पाठीशी आहे. बँक ऑफ महाराष्ट्रनेही या कामी मदत म्हणून पुसेगाव ग्रामपंचायतीला पाण्याचा टँकर देऊन सहकार्य केले आहे. पुसेगाव परिसरात श्री सेवागिरी देवस्थान ट्रस्ट आणि तुकाराम महाराजांचे वशंज मोरे महाराज यांच्या प्रयत्नातून पाच हजार झाडे लावण्यात आली आहेत. या झाडांचे संवर्धन करण्यासाठी महाबँकेने दिलेले टँकर उपयोगी पडणार आहेत. छायाचित्र - पुसेगाव ग्रामपंचायतीला बँक ऑफ महाराष्ट्रकडून टैंकर देताना ना. महेश शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील व इतर.
Social Plugin