दि.1 मे रोजी लग्न 5 मे ला ड्युटी वर रवाना ; काळेवाडीचा प्रसाद काळे हा जवान लग्नाच्या पूजेच्या दुसऱ्यादिवशी ड्युटीवर
बुध दि .[ प्रकाश राजेघाटगे ]
काळेवाडी ता.खटाव येथील जवान प्रसाद भरत काळे हा आपल्या लग्नासाठी एक महिन्याची सुट्टी काढून गावी आला होता. दि.1 मे रोजी तो चि.सौ.कां.वैष्णवी हिच्याशी तो विवाह बंधनात अडकला.यादरम्यान देशात युध्द परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीय सेनेने सर्व जवानांच्या सुट्ट्या रद्द करून तातडीने ड्युटीवर उपस्थित राहण्याच्या सर्वांना फोन द्वारे संदेश देण्यात आले. जवान प्रसाद काळे यालाही लग्नाची पूजा चालू असताना युनिटमधून तातडीने हजर राहण्याचा संदेश आला.कोणताही विचार न करता अंगावर ओली हळद असतानाच पूजेच्या दुसऱ्याच दिवशी देशाच्या संरक्षणासाठी तो नववधूचा निरोप घेऊन देशसेवेसाठी रवाना झाला आहे.
देशात युध्दाच्या पार्श्वभूमीवर सर्वांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत.सर्वत्र हायअलर्ट देत सर्तकतेच्या सूचना देण्यात आल्या असून भारतीय सेनेने ही सुट्टीवर गेलेलल सर्व जवानांना ड्युटीवर माघारी बोलवले आहे.लग्नानंतर नववधू सोबत फिरायला जाणे,मौजमस्ती करणे,कुटुंबात एकत्र राहणे ही स्वप्ने रंगवत सुट्टीवर आलेला प्रसाद काळे या जवानाला तातडीने ड्युटीवर जावे लागल्याने त्याची स्वप्ने प्रलंबित पडली.आपल्या कुटुंबासमवेत नववधूला ठेऊन तो देशसेवेसाठी निघून गेला.
देशसेवेसाठी जवान आपल्या कुटुंबांपासून दूर राहत सीमेवर जावून देशाचे रक्षण करत असतात.त्यांना मिळणाऱ्या वर्षातील सुट्ट्या थोडक्या असल्या तरी त्यात समाधान मानत देशासाठी जगणारे हे जवान नेहमीच कौतुकास पात्र असतात.सुट्टीवर आले की कुटुंबाला वेळ देण्याबरोबरच पैपाहुणे ,मित्रमंडळी यांच्या गाठीभेटीत त्यांची सुट्टी कधी संपते ते त्यांनाही समजत नाहीत. परंतू भावनिक नात्यात न गुंतता कुटुंबातील व्यक्तींना धीर देत पुन्हा देशसेवेसाठी जाण्यासाठी तयार असतात.कोरोना च्या जीवघेण्या परिस्थितीतही या जवानांच्या सुट्ट्या क्वारंटाईन मध्येच गेल्या होत्या.काळेवाडीचा हाच जवान त्यावेळी सुट्टीवर आला होता तेव्हा त्याला क्वारंटाईन व्हाव लागले होते.आपल्या व कुटुंबाच्या गावच्या काळजीपोटी हा जवान आपल्या घरासमोरील चारचाकी गाडीत राहून आपला क्वारंटाईनचा कालावधी घालवला.कुटुंबात एकत्र राहण्याची वेळ आली की त्याची सुट्टी संपली.तरीही देशसेवेसाठी हे जवान मोठ्या धाडसाने परिस्थितीला सामारे जात असतात.त्यांचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.आपल्या मुलाच लग्न झाल की त्याला लगेच ड्युटीवर जाव लागल याच दु:ख आईवडीलांना असण साहजिक आहे.सर्वांना अनोळखी असणारी नववधू आपले माहेरच घर सोडून सासरी आली खरी पण आपला जोडीदार देशसेवेसाठी निघून गेल्यानंतर तीची अवस्था कशी झाली असेल तरीही मोठ्या मनाने तिने आपल्या जोडीदाराला देशसेवेसाठी आनंदाने निरोप दिला त्या दोघांही नव दाम्पत्यांचे कौतुक आहे.
देशसेवेसाठी माझं कुंकू पाठवतेय....
आमच नुकतच लग्न होऊन पूजेच्या दुसऱ्यादिवशी ते ड्युटीवर जाणार अस समजल की थोड वाईट वाटल पण देशाची सेवा करण्यासाठी ते जात आहेत याचा मला अभिमान आहे.म्हणून मोठ्या आनंदाने मी देशसेवेसाठी माझं कुंकू पाठवलय. -वैष्णवी काळे ,नववधू काळेवाडी ता.खटाव
लग्नानंतर पूजेदिवशी मला युनिटमधून फोन आला की आपली सुट्टी रद्द करण्यात आल्या असून तातडीने युनिटमध्ये हजर रहा.याची कल्पना मी कुटुंबाला देताच सर्वांचा चेहरा पडला.तरीही सर्वांनी मला दुसऱ्या दिवशी आनंदाने देशसेवेसाठी निरोप दिला.त्यामुळे पूजेच्या दुसऱ्यादिवशी मी देशसेवेसाठी रवाना झालोय.- प्रसाद काळे (जवान ) काळेवाडी ता.खटाव
Social Plugin