*देगलूर / प्रतिनिधी
हदगाव येथील दैनिक देशोन्नतीचे तालुका प्रतिनिधी पत्रकार संजय सुर्यवंशी यांनी "मौजे निवघा तळणी सर्कलमधील पंचवीस गावे २५ तासांपासून अंधारात, महावितरणचे अधिकारी नॉट रिचेबल" या शीर्षकाखाली वस्तुनिष्ठ बातमी प्रकाशित केली. मात्र, या बातमीनंतर हदगाव-हिमायतनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबुराव कोहळीकर यांनी पत्रकार सुर्यवंशी यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकाराचा पत्रकार संरक्षण समितीने तीव्र निषेध नोंदवत ही घटना पत्रकार स्वातंत्र्यावर थेट आघात करणारी असल्याचे म्हटले आहे. समितीचे तालुकाध्यक्ष शेख असलम यांनी सांगितले की, “सत्य मांडणाऱ्या पत्रकारांना धमक्या देणे म्हणजे लोकशाही मूल्यांची पायमल्ली असून अशा प्रकारावर कठोर कारवाई व्हावी.”
या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित आमदारावर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा पत्रकार संघटनेने दिला आहे.
पत्रकारांच्या सुरक्षेसाठी शासनाने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली असून हे निवेदन उपविभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या मार्फत मा. मुख्यमंत्री यांना सादर करण्यात आले आहे.
या निवेदनावर पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष शेख असलम, सचिव गजानन टेकाळे, कार्याध्यक्ष धनाजी देशमुख, प्रसिद्धीप्रमुख धनाजी जोशी, प्रेस संपादक पत्रकार सेवा संघाचे राज्य उपाध्यक्ष विशाल पवार, इलेक्ट्रॉनिक मीडिया अध्यक्ष सय्यद समी, तसेच सुनील मदनुरे, प्रभू वंकलवार, अनिल पवार, संजय हाळदे, इस्माईल खान आदींसह अनेक पत्रकारांनी स्वाक्षऱ्या करत एकमताने निषेध व्यक्त केला आहे.





Social Plugin