Ticker

6/recent/ticker-posts

सव्वातीन लाखांचा गांजा जप्त



दिग्रस पोलिसांची कारवाई; घरमालक अटकेत, अमली पदार्थांवर धाड

 राजपाल बनसोड प्रतिनिधी दिग्रस 

तालुक्यातील साखरा येथे पोलिसांनी बुधवारी, दि. २८ मे रोजी दुपारी एका घरावर छापा मारून २७ किलो १०० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला. या गांजाची अंदाजित किंमत ३ लाख २५ हजार २०० रुपये असून, तो पाच प्लास्टिक पिशव्यांमध्ये साठवला होता. याप्रकरणी घरमालक लक्ष्मण राजू चव्हाण (वय ५५, रा. साखरा) याला तत्काळ अटक करण्यात आली.ही धडक कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी चिलुमुला रजनीकांत आणि पोलिस निरीक्षक सेवानंद वानखेडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली अत्यंत गोपनीय पद्धतीने करण्यात आली. 

दारव्हा येथील पोलिस पथकातील अविनाश गोदामले यांच्यासह दिग्रसचे सहायक पोलिस निरीक्षक गोविंद पांडव, उपनिरीक्षक राजेश लाहेकर, पोलिस अंमलदार रवींद्र मोलेवार, महादेव फलटणकर, रवींद्र जगताप आणि अन्य पोलिसांनी ही धाडसी कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली. आरोपी लक्ष्मण चव्हाण याच्या साखरा येथील घराची झडती घेतली असता,पाच मोठ्या प्लास्टिक पिशव्यांमध्ये हा अमली पदार्थ विक्रीसाठी लपवून ठेवल्याचे उघड झाले. त्याला तत्काळ जेरबंद करून त्याच्याविरुद्ध संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा अधिक सखोल तपास करत आहेत. या मोठ्या कारवाईने परिसरात खळबळ उडाली.