ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; महिलांसाठी योजनांची सविस्तर माहिती.
प्रतिनिधी:– मोहन जाधव.
चास (ता. कोपरगाव) – आठवडे बाजाराच्या पार्श्वभूमीवर चासनळी येथे पोस्ट विभागाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी जनजागृती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाला ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद लाभला.
ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामसेवक भाऊसाहेब गायकवाड होते, तर प्रमुख पाहुण्या म्हणून सरपंच सौ. सुनीता बनसोडे उपस्थित होत्या. कार्यक्रमात टपाल विभागाचे समन्वयक अमोल वाघमारे यांनी पोस्टाच्या बचत योजना, विमा योजना व विविध शासकीय लाभ योजना यांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी उदाहरणांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील लोकांसाठी या योजनांचा कसा उपयोग होतो, हे समजावून सांगितले.
सरपंच सुनीता बनसोडे यांनी महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांचा विशेष उल्लेख केला. “पोस्ट ऑफिस सेविंग बँक,लाडकी लेक योजना आणि सुकन्या समृद्धी योजना या महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उपयुक्त असून, ग्रामीण महिलांनी त्याचा लाभ घ्यावा,” असे आवाहन त्यांनी केले.
ग्रामसेवक गायकवाड यांनी पोस्ट ऑफिसचे ग्रामीण भागातील महत्त्व अधोरेखित करत सांगितले, “आज पोस्ट ऑफिस केवळ पत्रव्यवहारापुरते मर्यादित राहिलेले नसून, ते एक विश्वासार्ह बँकिंग यंत्रणा आणि शासकीय योजनांचे प्रभावी वितरण केंद्र बनले आहे.”
मेळाव्यानंतर पोस्ट ऑफिसच्या कर्मचाऱ्यांनी आठवडे बाजारात जाऊन प्रत्यक्ष संवाद साधला, माहितीपत्रकांचे वाटप केले आणि स्थानिक शाळा-महाविद्यालयांना भेट देऊन विद्यार्थ्यांना योजनांची माहिती दिली.
या उपक्रमासाठी कोपरगाव पोस्ट सब डिव्हिजनचे मेल ओव्हरसीअर अर्जुन मोरे, चासनळी पोस्ट ऑफिसचे सब पोस्टमास्तर संजय माळी,तसेच गिरीश महाले, बाळासाहेब चांदगुडे, शांताराम घुमरे, मल्हारी वाकचौरे, अनंता गडाख, गोरख फटांगरे, प्रकाश मोरे, अमोल सांबरे, मोहन जाधव आदींनी विशेष मेहनत घेतली.
कार्यक्रमाच्या शेवटी डाक आवेक्षक अर्जुन मोरे यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि "पोस्टाच्या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा," असे आवाहन केले.
ग्रामस्थांनी या अभिनव उपक्रमाचे मनःपूर्वक स्वागत करत पोस्ट विभागाचे कौतुक केले.
Social Plugin