Ticker

6/recent/ticker-posts

निकृष्ट व बोगस आरसीसी गटर कामाची चौकशी करण्याची मागणी



पाटण (दिनकर वाईकर) 

 पाटण नगरपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील रामापूर येथे बांधण्यात येत असलेल्या आरसीसी गटरचे काम अत्यंत निकृष्ठ आणि बोगस पध्दतीने खुलेआमपणे सुरू आहे. याकडे पाटण नगरपंचातीचे सर्रासपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. बोगस कामाचा उत्कृष्ठ नमुनाच या कामाकडे पाहिल्यावर लक्षात येत आहे. या कामाची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी किसान मंच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मुख्याधिकारी पाटण नगरपंचायत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे, पाटण नगरपंचायत कार्यक्षेत्रातील रामापूर येथील गगनगिरी महाराज आश्रम ते गजरे यांच्या दुकानापर्यंत आरसीसी गटरचे बांधकाम सध्या सुरू करण्यात आले आहे. सदरचे काम बांधकाम विभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मनमानी पध्दतीने चालू आहे. येथे बांधण्यात येत आलेले गटर हे पूर्णपणे चुकीच्या पध्दतीने बांधण्यात आले आहे. पाणी व घाण साठून दुर्गंधीचा त्रास वर्षानुवर्ष स्थानिक नागरीक सहन करत आहेत. यावर कोणतीही उपाययोजना न करता संबंधित गटार बंदिस्त करण्याचे काम चालू असल्याचे निदर्शनास येत आहे.

सदर गटरचे काम करत असताना मुळच्या गटरची कोणत्याही प्रकारे सफाई न करता त्यावर गटरचा स्लॅब टाकण्याचा घाट घातला जात आहे. अशा प्रकारचे काम पूर्ण झाल्यास सदर निधीचा गैरवापर होणार आहे व शासकीय पैशाचा अपव्यय होणार आहे. या सारखीच अन्य ठिकाणीही कामे झालेली असण्याची व होत असलेबाबत शंका उपस्थित होत आहे. तरी गत दोन वर्षांत सार्वजनिक बांधकाम विभागांकडून करण्यात आलेल्या सर्वच विकास कामांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. याबाबतीत आपल्या माध्यमातून योग्य त्या शासकीय विभागांकडून चौकशी होवून चुकीच्या कामांवर कारवाई व्हावी. येत्या पंधरा दिवसात योग्य ती कारवाई न झाल्यास नाईलाजास्तव आपल्या विरोधात उग्र स्वरुपाचे आंदोलन करावे लागेल, असा इशाराही शेवटी निवेदनात देण्यात आला आहे.

याबाबतचे निवेदन सातारा जिल्हा बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर, तहसीलदार पाटण, नगराध्यक्षा पाटण, मुख्याधिकारी पाटण नगरपंचायत पाटण, अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग पाटण उत्तर यांना देण्यात आले आहे.