Ticker

6/recent/ticker-posts

युवा कार्यकर्त्यांसाठी रायगड जिल्हा काँग्रेसच्यावतीने प्रशिक्षण शिबिराचे आयोजन



अलिबाग(रत्नाकर पाटील)

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने युवकांमध्ये राजकीय जागरूकता,संघटनात्मक कौशल्ये व संविधानिक मूल्यांची जाणीव निर्माण व्हावी या उद्देशाने युवा कार्यकर्ता निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर २८ व २९ जून २०२५ रोजी हॉटेल रविकिरण, अलिबाग येथे होणार आहे.या शिबिराचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून, ते या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करणार आहेत.

शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून मा.उल्हास दादा पवार माजी आमदार, डॉ.रामहरी रूपनवर माजी आमदार, प्रा.यशराज पारखी पाटील,सचिन सावंत प्रवक्ते हे युवकांशी संवाद साधून प्रशिक्षण सत्रात मौलिक विचार मांडणार आहेत.या दोन दिवसीय शिबिरात युवक कार्यकर्त्यांना संविधान, पक्षाची विचारधारा, संघटनात्मक बांधणी, निवडणूक रणनीती, तसेच सामाजिक माध्यमांचा प्रभावी वापर अशा विविध विषयांवर तज्ज्ञ व अनुभवी नेत्यांकडून प्रशिक्षण दिले जाणार आहे.

या उपक्रमाविषयी माहिती देताना रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. महेंद्र घरत यांनी सांगितले की, “काँग्रेस पक्षाच्या भविष्यासाठी मजबूत व सजग युवा कार्यकर्त्यांची गरज आहे. हे शिबिर कार्यकर्त्यांना विचार, चैतन्य व दिशा देईल.”

कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील युवा काँग्रेस कार्यकर्ते सहभागी होणार असून, या उपक्रमामुळे जिल्ह्यातील संघटनाला नवी ऊर्जा व प्रेरणा मिळणार आहे.अशी माहिती योगेश मगर माजी अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी अलिबाग यांनी दिली आहे.